बार कौन्सिलची निवडणूक अवैध असल्याचे कायदेपंडितांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:30 AM2018-03-31T11:30:24+5:302018-03-31T11:30:32+5:30
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये मतपत्रिकांची फोटोग्राफी करण्यात आल्यामुळे गुप्त मतदान पद्धती व निवडणूक नियमांचा भंग झाला आहे. ही निवडणूक प्रामाणिकपणे व पारदर्शीरीत्या झाली नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये मतपत्रिकांची फोटोग्राफी करण्यात आल्यामुळे गुप्त मतदान पद्धती व निवडणूक नियमांचा भंग झाला आहे. ही निवडणूक प्रामाणिकपणे व पारदर्शीरीत्या झाली नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. या आधारावर ही निवडणूक अवैध ठरते असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच, ही निवडणूक रद्द करून नव्याने शिस्तबद्धपणे निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवडणूक रद्द करण्यात यावी
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाची निवडणूक पारदर्शीपणे झाली नाही. मतदारांवर उमेदवारांचा दबाव होता. त्यामुळे अनेक मतदारांनी स्वत:च्या मतदानाचा पुरावा म्हणून पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकांचे मोबाईलने फोटो काढून घेतले. मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्याची अनुमती नव्हती. असे असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. यामागे मोठी शक्ती काम करीत असावी असा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे कौन्सिलने गैरप्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून निवडणूक रद्द करावी.
अॅड. शशिभूषण वाहने.
सखोल चौकशीची गरज
देशातील सर्व प्रकारच्या यंत्रणांमध्ये भ्रष्टाचाराचा प्रवेश झाला आहे. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाची निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. उमेदवार, मतदार व निवडणूक कर्मचारी यापैकी अपवाद वगळता कुणीही नियमांचे पालन केले नाही. कौन्सिलची मनाई असतानाही मतदान कक्षात मोबाईल नेण्यात आले. त्यानंतर मतदारांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकांचे फोटो घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई झाली पाहिजे.
अॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, हायकोर्ट विधिज्ञ संघटना.
दबावाखाली मतदान झाले
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये मतदारांनी उमेदवारांच्या दबावाखाली मतदान केले. मतदानाचा पुरावा म्हणून मतपत्रिकेचे फोटो काढण्याची सूचना मतदारांना करण्यात आली होती. त्यामुळे पुढील सर्व गैरप्रकार घडला. मतपत्रिकांचे फोटो काढणे फौजदारी गुन्हा आहे. निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीचा भंग झाला आहे. निवडणूक पारदर्शी व प्रामाणिकपणे झाली नाही. परिणामी ही निवडणूक अवैध ठरते. निवडणूक रद्द करण्यात आली पाहिजे.
कायद्याची पायमल्ली झाली
बार कौन्सिलच्या निवडणुकीमध्ये उमेदवार, मतदार व निवडणूक कर्मचारी यापैकी अपवाद वगळता कुणीही कायदे पाळले नाही. मतदारांना खूश करण्यासाठी शाही पार्ट्या देण्यात आल्या. तसेच, करियर धोक्यात आणण्याची धमकी देऊन दबाव निर्माण केला गेला. त्याचाच परिणाम म्हणून मतदारांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकांचे फोटो काढले. या गैरप्रकारासाठी संपूर्ण यंत्रणा दोषी आहे. त्यामुळे कौन्सिलने ही निवडणूक रद्द करून पारदर्शी पद्धतीने नवीन निवडणूक घ्यावी.
अॅड. एम. अनिलकुमार.
योग्य कारवाई व्हावी
बार कौन्सिलच्या निवडणुकीमध्ये झालेला मतपत्रिकांच्या फोटोग्राफीचा प्रकार खेदजनक आहे. वकील समाज कायद्याचा संरक्षक असतो. त्यामुळे त्यांनी कायद्याचे काटेकोर पालन करणे नैतिक जबाबदारी आहे. परंतु, निवडणुकीत अनेक गैरप्रकार घडले. नियमांची अंमलबजावणी झाली नाही. मतपत्रिकांच्या फोटोग्राफीमुळे गुप्त मतदान पद्धतीचा भंग झाला. ही बाब निवडणुकीच्या पारदर्शी व निष्पक्ष तत्त्वाला धक्का पोहोचविणारी आहे. कौन्सिलने ही बाब गांभिर्याने घेऊन योग्य कारवाई केली पाहिजे.
अॅड. राजेंद्र डागा