विरोधकच घामाघूम! नागपुरातील उकाडा असह्य, व्यंगचित्रांतून मांडला सरकारचा ‘दुर्भाग्य योग’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 06:17 AM2018-07-04T06:17:00+5:302018-07-04T06:17:00+5:30
विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याने सत्ताधारी घामाघूम होण्याची परंपरा आहे. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करून सत्ताधारी भाजपाने विरोधकांना अक्षरश: घामाघूम केले.
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याने सत्ताधारी घामाघूम होण्याची परंपरा आहे. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करून सत्ताधारी भाजपाने विरोधकांना अक्षरश: घामाघूम केले. विरोधी पक्षांची चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा करणारी पत्रकार परिषद लांबताच काहिलीने कावलेल्या पत्रकारांनी आता बस्स करा, असे सांगत चक्क विरोधी पक्षनेतेद्वय राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांना रोखले.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेकरिता विरोधी पक्षनेत्याच्या रविभवन येथील निवासस्थानी व्यंगचित्रांची नेपथ्यरचना केली होती. शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंत आणि फिटनेस चॅलेंजपासून मंत्र्यांच्या क्लिन चीटपर्यंत अनेक बाबींची रेवडी उडवली होती. विरोधी पक्षनेत्यांच्या मागील बाजूस असलेल्या पोस्टरवर शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थींची संख्या कमी करण्यावरून आणि पीककर्ज वितरणामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे वास्तव अधोरेखित करून सरकारला लक्ष्य केले होते. फिटनेस चॅलेंजऐवजी ‘फिसकटलेले’ सरकार अशी शब्दरचना केली होती. रोजगार, महागाई, स्मार्ट सिटी यावरही कुंचल्याचे फटकारे दिले होते. नाणारवरून आणि सत्ता सोडण्याच्या वल्गनांवरून शिवसेनेला चिमटे काढले होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले म्हणणे मांडले तेव्हा जवळपास सर्व पत्रकार घाम पुसत पुसत बातम्यांचे टिपण घेत होते. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले म्हणणे मांडायला सुरुवात केल्यावर तर उकाडा असह्य झाल्याने काही पत्रकारांनी चक्क नोटपॅडने वारा घ्यायला सुरुवात केली. तिकडे समोर बसलेले विरोधी नेतेही घामाघूम झाल्याने एक-दोन नेत्यांनी पत्रकार परिषद सुुरू असताना काढता पाय घेतला.
मुंÞडे यांनी प्रारंभीच पावसाळ्यात येथे अधिवेशन घेण्याचे कारण काय, असा सवाल केला. नागपूरमध्ये आणखी अधिवेशन घ्यायला आमची हरकत नाही. पण पावसाळ्यात अधिवेशन घेण्याचे कारण तर कळू द्या, असे ते म्हणाले. तब्बल पाऊण-एक तास झाला तरी पत्रकार परिषद न संपल्याने एक-दोन पत्रकारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होऊन त्यांनी आता आवरा, असा पवित्रा घेतला. दोन-चार प्रश्नानंतर घामाघूम पत्रकारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही घाम पुसत दिलगिरी व्यक्त केली.