विरोधक बोलायला लागले; राजकारण तापणार; जि.प.च्या स्थायी समितीत पडसाद उमटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 09:09 PM2023-05-24T21:09:07+5:302023-05-24T21:09:33+5:30
Nagpur News जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांचे सलोख्याचे संबंध असल्याने समित्यांच्या बैठकातही खेळीमेळीचे वातावरण असते. या सलोख्याची जिल्ह्यात चर्चा असल्याने मागील काही दिवसांत विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
नागपूर : जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांचे सलोख्याचे संबंध असल्याने समित्यांच्या बैठकातही खेळीमेळीचे वातावरण असते. या सलोख्याची जिल्ह्यात चर्चा असल्याने मागील काही दिवसांत विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. ते आता गैरप्रकारावर बोलायला लागले असून, अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत. याचे पडसाद गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.
१७ सामूहिक विकास निधीअंतर्गत पदाधिकारी व सदस्यांना निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु ठरल्याप्रमाणे निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधकांचा आहे. सदस्यांना न विचारताच परस्पर कामे देण्यात येत असल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे. शिक्षण समितीमार्फत वाटप करण्यात आलेल्या निधी वाटपात भेदभाव करण्यात आला आहे. काही सदस्यांना जास्त तर काहींना कमी निधी दिला. वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबतही अशीच परिस्थिती असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
समाजकल्याण विभागाकडून २० टक्क्यांतर्गत निधी वितरणातही भेदभाव झाला आहे. विरोधी सदस्यांना न विचारताच कामे मंजूर करण्यात आली. लघु सिंचन विभागाने निविदा न काढता आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना पदाधिकाऱ्यांनी कामे दिल्याचा आरोप केला आहे. विरोध अचानक आक्रमक झाल्याने याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत दिसणार असल्याने जि.प.तील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात भाजपचे वरिष्ठ नेते आढावा बैठका घेत असताना जि.प.तील सदस्य मात्र शांत असल्याने पक्षात नाराजीचा सूर असल्याने विरोधक अचानक आक्रमक झाल्याची चर्चा आहे.