सत्तारांचा राजीनामा मागून विरोधक बसले शांत; सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:23 AM2022-12-30T06:23:03+5:302022-12-30T06:23:54+5:30
केवळ मागणी करून विरोधक शांत झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे चित्र होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा मुद्दा गुरुवारी पुन्हा विधानसभेत उपस्थित करीत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यानंतर विरोधक आक्रमक होतील, असा कयास होता मात्र तसे काहीच झाले नाही. केवळ मागणी करून विरोधक शांत झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे चित्र होते.
अजित पवार यांनी या मुद्यावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र तो अध्यक्षांनी फेटाळून अजित पवार यांना आपले म्हणणे मांडण्यास संधी दिली. तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. गायरान जमीन देता येणार नाही हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी रद्द केला. दलालाच्या मार्फत आर्थिक व्यवहार करून सत्तार यांनी जमिनीचे वाटप केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगावे, अशी मागणी पवार यांनी विधानसभेत केली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्यावर भूमिका मांडली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"