विरोधक अडथळे आणणारच, कार्य करत रहा!

By admin | Published: June 9, 2017 02:31 AM2017-06-09T02:31:10+5:302017-06-09T02:31:10+5:30

केंद्र शासनाच्या कार्यप्रणालीवर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीका होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ...

Opponents will get obstacles, keep up the work! | विरोधक अडथळे आणणारच, कार्य करत रहा!

विरोधक अडथळे आणणारच, कार्य करत रहा!

Next

सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’ : पंतप्रधान मोदींना शाबासकीची थाप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या कार्यप्रणालीवर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीका होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाबासकीची थाप दिली आहे. गेल्या काही काळापासून देशात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. मात्र काही लोकांना त्यातून नुकसान होत आहे. ते विविध माध्यमातून प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्याकडे लक्ष न देता कार्यावर आणखी भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.
संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी नेपाळचे माजी लष्करप्रमुख रुग्मांगुद गटवाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, आसामचे वित्तमंत्री हेमंत बिस्वास शर्मा, महिंद्रा उद्योग समूहाचे चेअरमन आनंद आनंद महिंद्रा, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या काही काळापासून देश सुरक्षा तसेच आर्थिक क्षेत्रात मजबूत होत आहे. लोकांच्या आशाआकांक्षा जागृत करण्याचे काम होत आहे. मात्र अजूनही बरेच मैल गाठायचे आहेत. मात्र या प्रगतीमुळे काही लोकांच्या स्वार्थाला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे ते लोकांमध्ये गैरसमज पसरवून किंवा बुद्धिभेद करुन अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, या शब्दांत सरसंघचालकांनी विरोधकांचे नाव न घेता टीका केली. केवळ संघाचे स्वयंसेवक काम करत आहेत, म्हणून प्रगती होईल असे नाही. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. भारताची संस्कृती वैभवशाली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे व निश्चितच यात महाशक्ती होण्याची क्षमता आहे, असे मत गटवाल यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी पृथ्वीराजसिंह, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते. यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग १५ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ९०३ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली.

काँग्रेसने आणला होता गोवंशहत्याबंदीचा प्रस्ताव
गोहत्येबाबत देशभरात राजकारण तापताना दिसून येते. गोवंशहत्याबंदीबाबत सरसंघचालकांनी यावेळी एक माहिती दिली. संघाची स्थापना होण्याच्या पाच वर्षेअगोदर १९२० साली नागपुरात महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. डॉ. हेडगेवार यांच्याकडे अधिवेशनाच्या व्यवस्थेची जबाबदारी होती. संपूर्ण स्वातंत्र्याचा यात एक प्रस्ताव होताच. मात्र संपूर्ण गोवंशहत्याबंदीचादेखील प्रस्ताव मांडण्यात आला होता, असे सरसंघचालकांनी सांगितले.

सरसंघचालकांचे
अमेरिकेवर टीकास्त्र
जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पॅरिस पर्यावरण करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. या मुद्यावर सरसंघचालकांनी अमेरिकेच्या धोरणांवर जोरदार टीका केली. पर्यावरणाचा समतोल राखण्याची भाषा करणारे त्या भूमिकेवर जुळले राहत नाही. स्वार्थ मध्ये आला आणि त्यांनी करारातून काढता पाय घेतला, या शब्दांत सरसंघचालकांनी अमेरिकेचे थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले. भारताला कितीही नुकसान सहन करावे लागले तरी पर्यावरण रक्षणाची भूमिका सोडणार नाही, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

Web Title: Opponents will get obstacles, keep up the work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.