स्थलांतरित श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:13 AM2020-06-24T11:13:48+5:302020-06-24T11:15:43+5:30

बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे.

Opportunity for locals to replace migrant workers | स्थलांतरित श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना संधी

स्थलांतरित श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना संधी

Next
ठळक मुद्देउद्योगांकडून ३९० कामगारांची मागणीनियुक्ती प्रक्रिया आज सुरू होणार

कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान प्रवासी श्रमिक मोठ्या संख्येने आपापल्या राज्यात परतले आहेत. या कारणाने बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे. उद्योगांनी आतापर्यंत ३९० श्रमिकांची मागणी केली आहे. बुधवारपासून नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

आतापर्यंत जवळपास ८ हजार प्रवासी श्रमिक स्वगृही परतल्याचा औद्योगिक संघटनांचा दावा आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे. परंतु पर्याप्त मनुष्यबळाअभावी उत्पादन प्रभावित होत आहे. यादरम्यान राज्य शासनाच्या पुढाकाराने जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानंतर केंद्राच्या चमूने बुटीबोरी, हिंगणा आणि कळमेश्वर येथील उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत उद्योगांकडून ३९० रिक्त जागांवर भरती करण्याचे आश्वासन मिळाले आहे. ही संख्या कमी दिसत असली तरीही पुढे त्यात वाढ होईल, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.
उद्योग प्रारंभी टप्प्यात प्रवासी श्रमिक परतीची वाट पाहात होते. केंद्राचे उपायुक्त प्रभाकर हरडे म्हणाले, नागपुरात उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्राकडे ८० हजार आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

ग्रामपंचायत, आयटीआयचे सहकार्य
युनिटच्या जवळपास राहणारे श्रमिक उपलब्ध करून देण्याची उद्योगांची मागणी आहे. ही स्थिती पाहता जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने आपल्या क्षेत्रातील बेरोजगार युवकांना नोंदणी करण्याचा सल्ला देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे. या प्रकारे आयटीआयला थेट उद्योगांशी संपर्क साधून त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

काय आहे प्रक्रिया
राज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ई-स्वयं नावाने पोर्टल तयार केले आहे. उपायुक्त हरडे म्हणाले, बेरोजगार युवकांना त्याचा फायदा घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. उद्योगांनाही नोंदणी करून आपली आवश्यकता पोर्टलवर टाकावी लागते. केंद्र त्याच्या आधारावर उमेदवारांची यादी देतो. मुलाखतीनंतर उद्योग नियुक्ती करतो. अधिकाधिक उद्योग या पोर्टलशी जुळावेत, असा केंद्राचा प्रयत्न आहे.

Web Title: Opportunity for locals to replace migrant workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.