राणेंच्या भूमिकेकडे नागपूर समर्थकांचे लक्ष
By admin | Published: April 30, 2017 01:35 AM2017-04-30T01:35:12+5:302017-04-30T01:35:12+5:30
काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे नागपुरातील त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.
भाजप प्रवेशाचीही तयारी : राणेंसोबत राहण्याचा निर्धार
नागपूर : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे नागपुरातील त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. काहींनी थेट संपर्क साधून साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही जेथे जाल तेथे सोबत येऊ, अशा भावना कळविल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांच्याकडून समर्थकांना ‘वेट अॅन्ड वॉच’ चा सल्ला देण्यात आला आहे.
नागपुरात राणे यांचे बरेच समर्थक आहेत. काँग्रेससह शिवसेनेतही समर्थकांची कमी नाही. शिवसेनेतील समर्थकांना थेट भाजपमध्ये एन्ट्री घेण्यासाठी कारण मिळत नव्हते. आता राणेंनी प्रवेश घेतला तर हे निमित्त समोर करून सेनेतील समर्थक आपला भाजपा प्रवेशाचा मार्ग सुकर करण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेसमधील काही राणे समर्थकांनी तर भाजप नेत्यांशी संपर्क साधून चर्चाही केली आहे. राणे जर भाजपामध्ये येणार असतील तर इकडे नागपुरात आम्हीदेखील प्रवेश घेण्यास तयार आहोत, असे निरोप देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाकडून काहींना होकार देण्यात आला असून काहींना मात्र तूर्तास थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते राणे यांच्या विषयावर काहीच बोलण्यास तयार नाहीत. जो घटनाक्रम झालाच नाही त्यावर भाष्य करायचे नाही, अशी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. असे असले तरी कोणत्याही नेत्याने काँग्रेस सोडली तरी नागपुरातील एखाद अपवाद वगळता कुणीही कार्यकर्ते पक्ष सोडणार नाही, असा दावा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला आहे.(प्रतिनिधी)
तिकिटाची अट
नसेल तरच प्रवेश
महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्या. प्रत्येक प्रभागात भाजपाचे वर्चस्व वाढले आहे. अशात काँग्रेसकडून महापालिकेची निवडणूक लढलेल्या किंवा पाच वर्षांनी लढू इच्छिणाऱ्या राणे समर्थकांना तिकीट देण्याचे वचन देणे भाजपाला कठीण जाणार आहे. तिकिटाची अट घातली गेली नाही तरच संबंधितांचा भाजपाप्रवेश होईल, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
विदर्भविरोधी
भूमिकेचे काय?
अॅड. श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडली असता, नारायण राणे यांचे पुत्र आ. नीतेश राणे यांनी नागपुरात येत अणे यांना विरोध केला होता. महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे सांगत अणे यांच्यावर तोंडसुख घेतले होते. विशेष म्हणजे, नागपुरातील राणे समर्थकांनीही वेगळ्या विदर्भाची गरज नाही, अशीच भूमिका घेतली होती. भाजपाने उघडपणे वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता राणे जर भाजपात गेले तर त्यांचे नागपुरातील समर्थक संयुक्त महाराष्ट्रवादी भूमिका बदलून वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेचे समर्थन करतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.