आकाशात शनी, गुरू अन मंगळ जवळून पाहण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:25+5:302020-12-08T04:08:25+5:30
नागपूर : सध्या नागपूरच्या अवकाशात अंतराळातील गुरू, शनी आणि मंगळ ग्रहाचे वास्तव्य आहे. खुल्या डोळ्यानी कदाचित तुम्ही आवर्जून या ...
नागपूर : सध्या नागपूरच्या अवकाशात अंतराळातील गुरू, शनी आणि मंगळ ग्रहाचे वास्तव्य आहे. खुल्या डोळ्यानी कदाचित तुम्ही आवर्जून या पाहुण्यांना पाहिले नसेल. पुढे ८०० वर्षे प्रतीक्षा करण्यापेक्षा या ग्रहांना आता पाहण्याची संधी तुम्हाला आहे. रमण विज्ञान केंद्राने ही संधी दिली आहे. आजपासून केंद्रात ही व्यवस्था केली आहे.
रात्री अवकाशात आपल्याला शुभ्र चंद्र दिसतो. कधी कधी ताऱ्यांचा वर्षाव होण्याचेही दर्शन होते. अनेक ग्रहांना आपण केवळ पुस्तकात अभ्यासले आहे. पण सूर्यमालेतील काही ग्रह आपण प्रत्यक्षात पाहू शकतो. हे ग्रह आहेत गुरू, शनी आणि मंगळ. होय, हे ग्रह सध्या आकाशात आहेत. महत्त्वाचे म्हणजे २१ डिसेंबरला शनी आणि गुरू अतिशय जवळ येणार आहेत. असा दुर्मिळ योग तब्बल ८०० वर्षांत एकदाच येतो. हा संपूर्ण डिसेंबर महिना ते आपल्या पृथ्वीच्या जवळ आहेत आणि टेलिस्कोपने अगदी जवळून पाहता येणे शक्य आहे.
विद्यार्थी आणि अंतराळाबद्दल कुतूहल असलेल्या प्रत्येकासाठी रमण विज्ञान केंद्राने या ग्रहांना पाहण्याची सोपी संधी उपलब्ध केली आहे. आजपासून सायंकाळी ६ वाजतापासून केंद्रात टेलिस्कोपद्वारे या ग्रहांना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनीही आजपासून २३ डिसेंबरपर्यंत या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राचे शिक्षक विलास चौधरी यांनी केले आहे.