तरुण-तरुणींना मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:09+5:302021-08-28T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणूक आयोगातर्फे पुन्हा एकदा मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगातर्फे पुन्हा एकदा मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारांस मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. तसेच ज्यांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहे, मतदार यादीतील मजकूर दुरुस्त करून घ्यावयाचा आहे किंवा एकाच मतदारसंघात एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थानांतरित करायचे आहे त्यांनाही ही संधी उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमांतर्गत नवीन मतदान केंद्र तयार करणे, मतदान केंद्राच्या नावात, ठिकाणात बदल करणेही शक्य होणार आहे. तरी सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून पाहावे, नाव आढळून न आल्यास नमुना क्र. ६ सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. तसेच १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे औचित्य साधून न चुकता आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. आपला अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र कार्यालय किंवा ऑनलाइन/ऑफलाइन डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एनव्हीएसपी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. नमुना ६, ७, ८, ८-अ आवश्यकतेनुसार मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तसेच ज्यांचे नाव यादीत आहे पण फोटो नाही, अशा लोकांनीसुद्धा आपले छायाचित्र तातडीने जमा करावे अन्यथा त्यांची नावे वगळण्यात येतील. ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणारी ही मतदार यादी आगामी नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी वापरण्याची शक्यता असल्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी कळविले आहे.