मुस्लिम शिक्षकाचा विरोध करणे अयोग्य : संघाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:47 AM2019-11-23T00:47:28+5:302019-11-23T00:48:53+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केवळ मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकविण्यास एखाद्याला विरोध करणे अयोग्य असल्याची भूमिका घेतली आहे. संस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते व विद्यापीठातील वाद हा अनावश्यक आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनारस हिंदू विद्यापीठात डॉ.फिरोझ खान यांची संस्कृतचे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वाद पेटला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या नियुक्तीचा विरोध केला असून अभाविपनेदेखील याला समर्थन दिले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या केवळ मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकविण्यास एखाद्याला विरोध करणे अयोग्य असल्याची भूमिका घेतली आहे. संस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते व विद्यापीठातील वाद हा अनावश्यक आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ.फिरोज खान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी विरोध केला. यानंतर वातावरण तापले आहे. यासंदर्भात दोषारोप होत असताना संघाने वाराणसीचे विभाग संघचालक डॉ.जयप्रकाश लाल यांचे पत्रकच जारी केले आहे. साहित्य विभागातील नियुक्तीसंदर्भात सुरू असलेल्या वादाबाबत सखोल मंथन करण्यात आले. डॉ.फिरोझ खान यांच्या नियुक्तीला विरोध करणे अयोग्य आहे, असे संघाचे मत आहे. संघ अशा विरोधाशी सहमत नाही. संस्कृत साहित्याला समर्पित व श्रद्धा भावनेने शिकविणाऱ्या तसेच अधिकृत निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या कुठल्याही व्यक्तीला धर्माच्या आधारावर विरोध योग्य नाही. अशी कृती सामाजिक सौहार्द बिघडविणारी आहे. संघ अशी वृत्ती व प्रवृत्तीचा विरोध करतो. संस्कृत भाषा व साहित्याचा प्रचार-प्रसार संपूर्ण जगात झाला पाहिजे, असे पत्रकात नमूद आहे.