कदमांच्या विरोधात विरोधक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:11 AM2018-09-07T00:11:03+5:302018-09-07T00:13:49+5:30
महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी कदम यांच्या विरोधात निदर्शने केली. तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेही भाजपावर नेम साधण्याची ही संधी व दवडता कदम यांच्यावर कारवाईची मागणी करीत आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांच्या विरोधात विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी कदम यांच्या विरोधात निदर्शने केली. तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेही भाजपावर नेम साधण्याची ही संधी व दवडता कदम यांच्यावर कारवाईची मागणी करीत आंदोलन केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात धंतोली येथील भाजपा कार्यालयात मडके फोडून आ. राम कदम यांचा निषेध करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार नारेबाजी केली. यावेळी कांबळे म्हणाल्या, भाजपा नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांनी महिला सन्मानाला ठेच पोहचविली आहे. या प्रकरणी राम कदम यांनी जाहीरपणे महिलांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनात राजेश अधव, स्मिता वासनिक, ज्योति मेश्राम, सविता शेंडे, सुनंदा पुणेकर, जोसना सिंह, इंदिरा लोखंडे, प्रमिला टेंबेकर,अर्चना कांबळे आदींचा सहभाग होता. राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष नूतन रेवतकर व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष पूनम रेवतकर यांच्या नेतृत्वातही निदर्शने करण्यात आली. या वेळी कदम यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले. आंदोलनात संदीप मेंढे, मंजूषा सोनोने, वंदना मलिक आदी सहभागी झाले.
शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांच्या नेतृत्वात फुटाळा तलाव येथे निदर्शने करण्यात आली. महिलावरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यासाठी भाजपा सरकार जबाबदार असल्याचा आरोप बडवाईक यांनी केला. राम कदम यांनी राजीनामा देण्याची मागणी करीत तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात रजनी राऊत, शालिनी सरोदे, नलिनी करंगळे, बेबी गडेकर, शेख, प्रमिला धामणे, मंदा वैरागडे, अल्का जिभंकर, ज्योती पाटील, अर्चना कापसे आदी सहभागी झाले.
शिवसेनेनेही भाजपावर नेम साधण्याची संधी साधली. संविधान चौकात आंदोलन करीत कमद यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्ये त्यांची मानसिकता दर्शवितात, अशी टीका शिवसेना नेत्यांनी केली. आंदोलनात मंदाकिनी भावे, अल्का दलाल, सुरेखा खोब्रागडे, किशोर कुमेरिया, सूरज गोजे, राजेश कनोजिया, किशोर ठाकरे, सुनील बॅनर्जी, हितेश यादव, मनोज साहू आदींनी भाग घेतला.