विरोधी पक्ष आमदारांच्या नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ‘मोदी हाय हाय’ घोषणा देत हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:22 PM2017-12-11T21:22:54+5:302017-12-11T21:23:13+5:30
आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागील तीन वर्षांत काय केले? याचा हिशेब द्या, अशी मागणी आणि ‘भाजप सरकार, हाय हाय’, ‘मोदी हाय हाय’, अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात आंदोलन केले.
हेच का तुमचे अच्छे दिन
आॅनलाईन लोकमत
नागपूर : आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागील तीन वर्षांत काय केले? याचा हिशेब द्या, अशी मागणी आणि ‘भाजप सरकार, हाय हाय’, ‘मोदी हाय हाय’, अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात आंदोलन केले.
सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकत्र आले. तेथून विधानभवनापर्यंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वात विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. ‘भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत आमदारांनी हल्लाबोल केल्याने विधानभवन परिसर दुमदुमला.
आंदोलन करताना आमदारांच्या हातात ‘कवडीमोल भावाने गेले सोयाबीन, हेच का तुमचे ‘अच्छे दिन’, ‘हल्लाबोल हल्लाबोल’, ‘कर्जमाफीचा अर्ज भरून शेतकरी बेजार’,‘ फसवणूक करणारं, हे नव्हं माझं सरकार’, असे फलक होते. आमदारांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करीत शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाºया सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डल्लामार प्रकरणे उघड करू’, असे वक्तव्य केले होते. याचा समाचार घेताना धनंजय मुंडे यांनी या भेकड नाकर्ते सरकारच्या धमक्यांना भीक घालत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करावे, असे आव्हान त्यांनी दिले.
या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. सुनील केदार, आ. विजय वडेट्टीवार, आ. भाई जगताप, आ. स्वरुपसिंग नाईक, आ. शशीकांत शिंदे, आ. सुनील तटकरे, आ. प्रकाश गजभिये, रिपब्लिकन पक्ष आ. जोगेंद्र कवाडे, शेकापाचे आ. जयंत पाटील, आ. हेमंत टकले यांच्यासह ३० पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते.