आमदार निवासातील 'कोरोना' विलगीकरण कक्षाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:46 PM2020-03-13T23:46:17+5:302020-03-13T23:47:29+5:30
आमदार निवास येथे ‘कोरोना’ग्रस्तांसाठी तयार करण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षाला परिसरातील नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमदार निवास येथे ‘कोरोना’ग्रस्तांसाठी तयार करण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षाला परिसरातील नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. सध्या सुरक्षित असलेल्या सिव्हिल लाईन परिसरात विलगीकरण कक्ष उघडून ‘कोरोना’ला कशाला आमंत्रण देता, असा सवाल नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
‘कोरोना’ग्रस्तांसाठी आमदार निवास रिकामे करण्यात आले आहे. येथील १८० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. येथे ‘कोरोना’ आजारावर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिव्हिल लाईन परिसरात विलगीकरण कक्ष उघडण्यात येत असल्याने परिसरात राहणारे नागरिक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. या कक्षामुळे इतरांनाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विलगीकरण कक्ष शहराच्या बाहेर उघडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. शुक्रवारी दुपारी नगरसेविका प्रगती पाटील, पवन मोरे, रणधीर नशिने, अमर झुनके, सुमित चांदेकर, निखिल गायकवाड, सुचित्रा नशिने, ओमप्रकाश शिरपूरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. विलगीकरण कक्ष अतिशय सुरक्षित असून ‘कोरोना’चा फैलाव होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.