तोंडावर सिगारेटचा धूर सोडल्याचा विरोध केल्याने नागपुरात खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:37 AM2018-04-09T10:37:31+5:302018-04-09T10:37:41+5:30
सिगारेटच्या धूर चेहऱ्यावर आल्याने झालेल्या वादात असामाजिक तत्त्वांनी दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री शंकरनगर चौकातील शिवाजीनगर येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिगारेटच्या धूर चेहऱ्यावर आल्याने झालेल्या वादात असामाजिक तत्त्वांनी दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री शंकरनगर चौकातील शिवाजीनगर येथे घडली. श्रीकांत कश्यप आणि सूरज शेंडे अशी जखमींची नावे आहे. शिवाजीनगर येथील एचडीएफसी बँकेजवळ रात्री चार चाकी वाहनात एक पानठेला लागतो. रात्री १२.१५ वाजता श्रीकांत आणि सूरज पानठेल्यावर खर्रा घेण्यासाठी आले. तिथे पाच-सहा युवक अगोदरपासूनच उभे होते. त्यातील काही युवक सिगारेट ओढत होते. दरम्यान आरोपी युवकांनी सिगारेटचा धूर श्रीकांतच्या चेहºयाजवळ सोडला. श्रीकांतने त्यांना समजावू लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पाहता-पाहता इतर युवकांनी श्रीकांत व सूरजवर हल्ला केला. श्रीकांतला पकडून त्याच्या डोक्यावर वार केले. यामुळे श्रीकांत बेशुद्ध झाला. हल्लेखोरांनी त्याच्या पायावर दगडाने वार केला. हल्लेखोरांनी सूरजलाही मारहाण करून जखमी केले. घटनेच्या वेळी पानठेला चालकासह इतर लोकही उपस्थित होते. परंतु कुणीही मदतीसाठी धावले नाही. दोघांना जखमी करून हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
आरोपींची संख्या लपवली
सूत्रानुसार या घटनेत पाच ते सहा आरोपी होते. पोलीस केवळ तीन लोकांनीच हल्ला केल्याचे सांगत आहे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे.