आदिवासी नेत्यांचा स्वअस्तित्वासाठी धनगर आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:41 AM2017-08-31T01:41:36+5:302017-08-31T01:42:18+5:30

धनगर समाज हा आदिवासीच आहे. धनगर समाजाचा आदिवासीत समावेश करण्यात आला तर नव्या नेतृत्त्वाचे आव्हान उभे राहील.

Opposition of Dhanagar reservation for tribal leaders | आदिवासी नेत्यांचा स्वअस्तित्वासाठी धनगर आरक्षणाला विरोध

आदिवासी नेत्यांचा स्वअस्तित्वासाठी धनगर आरक्षणाला विरोध

Next
ठळक मुद्देविकास महात्मे यांची टीका : भाजपाने जाहीरनाम्यातील आश्वासन पाळावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धनगर समाज हा आदिवासीच आहे. धनगर समाजाचा आदिवासीत समावेश करण्यात आला तर नव्या नेतृत्त्वाचे आव्हान उभे राहील. स्वत:ची निवडून येण्याची व पदे भोगण्याची शक्यता कमी होईल, या भीतीने स्वअस्तित्वासाठी आदिवासी नेते धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आहेत, अशी टीका धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी बुधवारी केली.
महात्मे म्हणाले, आदिवासी आमचे बंधू आहेत. धनगरही मागास आहेत. त्यामुळे आदिवासी लोकांचा विरोध नाही. फक्त नेत्यांचा तेवढा विरोध आहे. भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची कोणत्याही पद्धतीने पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली.
डिसेंबर २०१५ मध्ये धनगर आरक्षणासाठी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसला सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यास सांगितले. आता दीड वर्ष झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. टाटा इन्स्टिट्यूट राज्यातील ३६ जिल्ह्यात व पाच राज्यात सर्वेक्षण करीत आहेत. इतर राज्यांनी धनगर समाजाला कसे आरक्षण दिले याचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न लावून धरण्यासाठी लवकरच नागपुरात धनगर समाज संघर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले जाईल. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रित करून आरक्षण देण्याची हमी घेऊ, असेही त्यांनी सांगितले. यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, मोठे देसाई, नागपूर जिल्हाध्यक्ष हरीश खुजे, दादाराव हटकर, शरद उरकुडे, मोरेश्वर झिले आदी उपस्थित होते.
सोलापूर विद्यापीठास अहल्यादेवी होळकर यांचे नाव द्या
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली असल्याचे डॉ. विकास महात्मे यांनी सांगितले. नुकतेच सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणासाठी मोर्चा काढण्यात आला होता. या अनुषंगाने २८ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले होते. २९ आॅगस्ट रोजी आपण मुंबई येथे प्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन संबंधित मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली, असा दावाही डॉ. महात्मे यांनी केला.

Web Title: Opposition of Dhanagar reservation for tribal leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.