विरोधकांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:24 AM2019-05-24T00:24:53+5:302019-05-24T00:26:54+5:30
:व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.
महाल येथील गडकरींच्या निवासस्थानाजवळ झालेल्या झालेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आ.आशिष शेलार, नागपूरचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.अनिल सोले, आ.मिलिंद माने, आ.विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, अॅड.सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरमध्ये अनेकांनी जातीपातीचे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन गडकरी यांनी जातपात न मानता सर्वांचे काम केले. त्यामुळे सर्वांनी त्यांना मतदान केले. नागपूरच्या इतिहासात गडकरी यांच्याएवढी मतं कुणीही घेतली नाही. त्यामुळेच विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. मिळालेला विजय डोक्यात जाणार नाही, तो मनात साठवून ठेवू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. निवडणुकीत आपण प्रचाराची पातळी खाली जाऊ दिली नाही. विचाराचा सामना विचाराने करायचा असतो. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, पण अहंकार वाढणार नाही याचे वचन मी देतो. असे गडकरी म्हणाले. आज दिल्लीला जात असताना हवामान खराब झाले. त्यामुळे विमान वर-खाली झाले व मीदेखील दीड-दोन फूट उसळलो. वाटलं, आता काय होणार ? मात्र जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते व हीच माझी ताकद आहे, असेदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.
ही राज्यातील शेवटची पाणीटंचाई
आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे व पाणीटंचाई जाणवते आहे. आम्ही राज्यभरात सिंचनाची कामे हाती घेतली आहे. यावर्षी असलेली पाण्याची टंचाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील शेवटची पाणीटंचाई असेल. पुढील वर्षी ती राहणार नाही. पाण्याचा प्रश्न आम्ही अग्रक्रमाने सोडवू, असे गडकरी यांनी सांगितले.