विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे विषारी औषध; नीलम गो-हे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:02 PM2017-12-11T21:02:12+5:302017-12-11T21:14:24+5:30
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विषारी औषध असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरहे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विषारी औषध असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरहे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पिकावरील किडीची उपमा देणाऱ्या विखे पाटील यांचा त्यांनी समाचार घेतला.
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत ९३ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारे उद्धव ठाकरे आणि भाजप पिकांवरील किडीप्रमाणे असल्याची टीका विखे पाटील यांनी केली होती. यावेळी गोरहे यांनी कापूस, सोयाबीन, धान पिकावरच नव्हे तर राजकारणातही कीड लागली आहे. ते विषारी रसायन असून शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा टोला त्यांनी लगावला.
गोरहे म्हणाल्या, किडीपेक्षा औषध शेतकऱ्यांसाठी जहाल असते. विषारी औषधांच्या फवारणीमुळेच शेतकऱ्यांना मृत्यू झाला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळे विखे पाटील पिता-पुत्रांना मंत्रिपद मिळाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही आहे. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे. विखे पाटील हे ‘संपफोडे’ असून त्यांनीच शेतकऱ्यांचा संप फोडण्यासाठी प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांचा कळवळा दाखवित आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे.