ईडीच्या भीतीमुळे पळालेले एनडीएसोबत, वृंदा करात यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:19 AM2023-07-19T11:19:19+5:302023-07-19T11:21:20+5:30
‘इंडिया’ सामान्यांचा आवाज बनेल
नागपूर : विरोधी पक्षातील लोकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून त्यांच्या पक्षापासून तोडण्यात आले व नंतर त्यांना भाजपने आपल्या सोबत घेतले. ईडीच्या भीतीमुळे पळालेले आज एनडीएसोबत असल्याचे चित्र देशाला पाहायला मिळत आहे, अशी टीका माकपा पोलिट ब्यूरोच्या सदस्य व माजी खासदार वृंदा करात यांनी केली.
आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या बैठकीसाठी वृंदा करात या मंगळवारी नागपुरात आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, भाजपला काहीही करून सत्ता हवी आहे. त्यांना तत्त्वांशी घेणेदेणे नाही. २४ विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेले ‘इंडिया’ ही आघाडी जनतेचा आवाज बुलंद करेल. महागाई व बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर आवाज उठवेल. ही आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काम करेल. आता विरोधी पक्षांवर मोठी जबाबदारी आली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकजुटीने राहण्याची वेळ आली आहे. हे सर्व पक्ष देश व संविधान वाचविण्यासाठी एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव अरुण लाटकर उपस्थित होते.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार
- महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते योग्य नाही. राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप येईल, असा दावा करात यांनी केली. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच सत्तेत वाटा दिला. भाजपच्या मशीनमध्ये सर्व स्वच्छ होतात, अशी टीकाही त्यांनी केली.