नाला मधुगंगा जलाशयाला जाेडण्यास विराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:48+5:302021-04-14T04:08:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : मधुगंगा जलाशयातून माेहपा (ता. कळमेश्वर) शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाताे. या शहरातील पिण्याच्या पाण्याची ...

Opposition to Nala Madhuganga Reservoir | नाला मधुगंगा जलाशयाला जाेडण्यास विराेध

नाला मधुगंगा जलाशयाला जाेडण्यास विराेध

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : मधुगंगा जलाशयातून माेहपा (ता. कळमेश्वर) शहराला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाताे. या शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी लाेहगड शिवारातून वाहणारा नाला या जलाशयाला जाेडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या नालाजाेड प्रस्तावाला लाेहगड व झिल्पी येथील शेतकऱ्यांनी विराेध दर्शविला असून, हा नाला जलाशयाला जाेडल्याने या भागातील ८०० एकर ओलिताची बागायती शेती पुढे काेरडवाहू हाेणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

माेहपा शहरातील नागरिकांना पिण्यासाठी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून तत्कालीन मंत्री बॅरि. शेषराव वानखेडे यांच्या प्रयत्नाने सन १९५९ मध्ये मधुगंगा जलाशयाची निर्मिती करण्यात आली होती. मधुगंगा नदीवरील हे जलाशय उगमापासून जवळ असल्याने त्यात पाण्याची आवक कमी आहे. त्यामुळे हे जलाशय पूर्ण क्षमतेने भरत नाही. शिवाय, त्यात माेठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. या जलाशयावर २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी माेटरपंप बसविले असून, ते सिंचनासाठी नियमित पाण्याची उचल करतात. परिणामी, माेहपा शहराला दरवर्षी मे व जूनमध्ये पाणीसमस्येला सामाेरे जावे लागते.

ही समस्या साेडविण्यासाठी लाेहगड शिवारातील नाला या जलाशयाला जाेडण्याचा प्रस्ताव पुढे आला. या नाल्यावर झिल्पी शिवारात पाझर तलाव असून, हा तलाव ओव्हरफ्लाे झाल्यास त्यातील पाणी गावाच्या दिशेने वाहते. या नाल्यावर सहा सिमेंट व चार भूमिगत बंधारे असून, त्यात तलावातून झिरपणारे पाणी साठवून राहते. त्यामुळे या भागातील जलस्तर वाढण्यास मदत झाल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी मुबलक पाणी मिळते. त्यामुळे या भागात माेठ्या प्रमाणात संत्राबागा तयार झाल्या आहेत.

....

पाण्याची पातळी खाेलवर

लाेहगड व झिल्पी भागातील भूगर्भात काळा दगड असल्याने तसेच हा दगड सच्छिद्र नसल्याने येथील भूगर्भातील पाण्याची पातळी ८०० ते ९०० फूट खाेल आहे. या भागातील शेतकरी नाल्याच्या काठी विहिरी खाेदून त्यातील पाण्यावर शेती करतात. त्यामुळे या परिसरात ४० हजाराच्या आसपास संत्र्याची झाडे आहेत. हा नाला वळवण्यात आल्यास या भागात पाणीटंचाई निर्माण हाेऊन संत्राबागा धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे भविष्यात काेरडवाहू शेती करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

...

नालाजाेड प्रस्तावाचा आराखडा

प्रशासनाने या नालाजाेड प्रस्तावाचा आराखडा तयार केला असल्याची माहिती मिळाली आहे, असे चंद्रशेखर धवड यांनी सांगितले. याबाबत संबंधित विभाग मात्र गप्प आहे, असा आराेप त्यांनी केला. या परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी खूप खाेल आहे. हा नाला वळवण्यात आल्याने ती आणखी खाेल जाईल. त्यामुळे आम्हाला पाण्याच्या थेंबासाठी भटकंती करावी लागेल, अशी प्रतिक्रिया झिल्पी येथी विजय गिरी यांनी व्यक्त केली.

...

नाला वळविण्याच्या दृष्टीने परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होईल, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे.

- पी. बी. धकाते,

मृद व जलसंधारण अधिकारी (प्रभारी),

कळमेश्वर.

Web Title: Opposition to Nala Madhuganga Reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.