बाबासाहेबांच्या अपमानावरून विरोधक-शिंदेसेना आमनेसामने; महाविकास आघाडीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 07:33 IST2024-12-20T07:32:57+5:302024-12-20T07:33:26+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या बाहेर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

opposition shinde sena face to face over insult to dr babasaheb ambedkar | बाबासाहेबांच्या अपमानावरून विरोधक-शिंदेसेना आमनेसामने; महाविकास आघाडीचे आंदोलन

बाबासाहेबांच्या अपमानावरून विरोधक-शिंदेसेना आमनेसामने; महाविकास आघाडीचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या बाहेर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

गुरुवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन करून परिसर दणाणून सोडला. गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून विरोधकांकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या आमदारांनीही विधिमंडळ परिसरात आंदोलन केले. यावेळी त्यांनीही काँग्रेसनेच बाबासाहेबांचा वेळोवेळी अपमान केल्याचा आरोप करीत, काँग्रेसला बाबासाहेबांप्रति असलेला पुळका ढोंगी असल्याची टीका त्यांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विधानभवनात मोर्चा आणला. विरोधकांचे आंदोलन आटोपताच शिंदेसेनेच्या आमदारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले.

गृहमंत्री शाह यांनी बाबासाहेबांचा नव्हे तर देशाचा, नागरिकांचा, संविधानाचा अपमान केला आहे. त्यांच्या बोलण्याची चौकशी व्हावी. त्यांनी देशाची माफी मागावी. - आदित्य ठाकरे

देशाला समानता, बंधुभाव व स्वतंत्रतेचा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. हीच देशाची संपत्ती आहे आणि हेच आमचे दैवत आहे. आम्हाला स्वर्गाशी घेणेदेणे नाही. - डॉ. नितीन राऊत

शाह यांनी बोललेले फक्त अर्धवट शब्द काँग्रेसने बाहेर काढले. काँग्रेसचे लोक नाटकं करतात याच्या विरोधात आम्ही शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आंदोलन पुकारले आहे. - रमेश बोरनारे

Web Title: opposition shinde sena face to face over insult to dr babasaheb ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.