संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी
By मंगेश व्यवहारे | Published: December 29, 2022 05:58 AM2022-12-29T05:58:37+5:302022-12-29T05:59:43+5:30
विरोधकांनी संत्र्यावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले.
मंगेश व्यवहारे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहिल्या आठवड्यात विरोधकांनी सभागृहाबाहेर लाडू, पेढे, श्रीखंडावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. दुसऱ्या आठवड्यातही पहिल्या दिवसापासून पायऱ्यांवरचा जोर कायमच ठेवला. तर बुधवारी विरोधकांनी संत्र्यावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. ‘संत्री आहेत गोल गोल, सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल...’ असा सूर आवळत घोषणांची लाखोली वाहत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महाविकास आघाडीतील आ. अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, विकास ठाकरे, रोहित पवार, डॉ. किरण लेहमाटे, सुनील भुसारे, शेखर निकम ही आमदार मंडळी ‘शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान’ अशा आशयाचे फलक घेऊन सभागृहाच्या पायऱ्यावर सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. तेवढ्यात आमदार चेतन तुपे हे संत्र्याचा बॉक्स घेऊन आले. सर्वांना संत्रे देऊन संत्र्यावरून घोषणाबाजी करीत विरोधकांना टार्गेट करणे सुरू केले.
‘नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री’, ‘‘दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर...’ अशा घोषणा देत अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा’, ‘खोके येऊ द्या, येऊ द्या, उद्योग जाऊ द्या, जाऊ द्या...’ अशा आशयाचे फलकही झळकविले. आंदोलनात अजित पवार, छगन भुजबळ, सुनील केदार, भास्कर जाधव, अदिती तटकरे सहभागी झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"