शुल्कवाढ स्थगितीला संस्थाचालकांचा विरोध; नागपूर विद्यापीठासमोर आंदोलन
By आनंद डेकाटे | Published: September 16, 2022 05:56 PM2022-09-16T17:56:37+5:302022-09-16T18:10:33+5:30
२० टक्के शुल्कवाढ लागू करण्याची मागणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयीन शुल्कामध्ये २० टक्के शुल्कवाढ केली होती. परंतु विद्यार्थी संघटनांचा या शुल्कवाढीला प्रचंड विरोध होता. याविरुद्ध विद्यार्थी संघटनांनी सातत्याने आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठाने या निर्णयाला स्थगिती दिली. आता या स्थगितीच्या विरोधात संस्थाचालक रस्त्यावर उतरले आहेत. स्थगिती रद्द करून शुल्कवाढ लागू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी संस्था चालकांनी विद्यापीठ प्रशासन भवनासमोर निदर्शने केली.
निदर्शनानंतर शिष्टमंडळाने कुलगुरु डाॅ. सुभाष चौधरी यंची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. संस्था चालकांचे म्हणणे आहे की, विद्यपीठाने तब्बल ९ वर्षानंतर गेल्या ६ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून महाविद्यालयीन शुल्कामध्ये २० टक्के वाढ केली. शासन नियम, व उच्च न्ययायालयाच्या निर्णयाप्रमाणे तसेच महागाई, कर्मचाऱ्यांचे सातत्याने वाढणारे वेतन लक्षात घेता विद्यापीठाने वाढवलेली शुल्कवाढ योग्य होती.
सामान्य विद्यार्थ्यांना या शु्ल्कवाढीचा कुठलाही परिणाम हाेत नाही. कारण एससी, एसटी, ओबीसी, मराठा, अल्पसंख्यांक आणि खुल्या प्रवर्गातील अल्प उत्पन्न गट धारक विद्यार्थ्यांची संपूर्ण फी, राज्य शासन शिष्यवृत्ती व इतर संसाधनातुन महाविद्यालयांकडे परस्पर भरत असते. असे असताना काही संघटनांच्या दबावामुळे विद्यापीठाने या शुल्कवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली. शु्लकवाढीवरील ही स्थगिती तातडीने तातडीने हटविली नाही तर संस्थाचालक विद्यापीठाला असहकार्य करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
विद्यापीठ महाविद्यालयीन संस्था चालक महासंघातर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात समन्वयक प्रा. दिवाकर गमे, प्रा.डाॅ. मारोती वाघ, अंतु भिवगडे, डाॅ. राजेश भोयर, डाॅ. संजय धनवटे, संदिप काळे, पांडुरंग तुळसकर,प्रविण कडु, डाॅ. सारिका चौधरी, प्रविण भांगे,उदय टेकाडे,डाॅ.सचिन बोंगावार,प्रा. विजय टेकाडे,डाॅ. सतिश भोयर,रविंद्र बिजवे, प्रशांत जांभुळकर,डाॅ. सचिन बोंगावार,डाॅ.संजय चोरे आदींचा समावेश होता.