विरोधकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न : राजनाथसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:07 PM2019-01-20T22:07:56+5:302019-01-20T22:08:56+5:30
आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची पाने असलेल्या रामायण, महाभारताची रचना करणारे महर्षी वाल्मिकी व महर्षी व्यास हे अनुसूचित जाती-जमातीमधील होते. देशाच्या विकासात या समाजाचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. मात्र विरोधी पक्ष तसेच कॉंग्रेसकडून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्ये भाजपाविषयी भ्रामक माहितीचा प्रचार करण्यात येत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लावला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आयोजित विजयी संकल्प सभेदरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची पाने असलेल्या रामायण, महाभारताची रचना करणारे महर्षी वाल्मिकी व महर्षी व्यास हे अनुसूचित जाती-जमातीमधील होते. देशाच्या विकासात या समाजाचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. मात्र विरोधी पक्ष तसेच कॉंग्रेसकडून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्ये भाजपाविषयी भ्रामक माहितीचा प्रचार करण्यात येत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लावला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आयोजित विजयी संकल्प सभेदरम्यान ते बोलत होते.
कस्तूरचंद पार्क येथे झालेल्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विनोद सोनकर, दुश्यंत गौतम, व्ही.सतीश, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह आमदार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
गरिबी हटाओच्या नावाखाली कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वत:चीच गरिबी हटविली. मात्र निवडणूक आली की त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची बरोबर आठवण येते. विरोधकांचे राजकारण भयाभोवतीच फिरते आहे. खोट्या गोष्टी समोर करुन अपप्रचार करण्यात येत आहे. दलित, मुस्लिम, वंचितांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप गडकरी यांनी लावला. धर्मपाल मेश्राम यांनी संचालन केले.
कॉंग्रेसला हडपायची होती इंदू मिलची जागा : मुख्यमंत्री
इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, ही कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. मात्र संपुआ व आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्मारकासाठी एक इंचही जमीन मिळाली नाही.कॉंग्रेसला तर इंदू मिलची जागा हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आमचे सरकार आल्यावर मी फाईल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो. त्यांनी संबंधित मंत्र्यांना बोलावून तीन दिवसात जमीन स्मारकासाठी मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले व खरोखरच पुढील तीन दिवसात जागा मिळाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदू मिल येथे २०२० पर्यंत बाबासाहेबांचे स्मारक पूर्णत्वास येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
विदर्भवाद्यांची निदर्शने
दरम्यान, सभेदरम्यान काही विदर्भवादी कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या कार्यकर्त्यांनी पत्रकेदेखील भिरकावली. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. हे लोक कॉंग्रेसने पाठविले होते, असा आरोप यावेळी गडकरी यांनी केला.