- तर विरोधकांना बॉम्बवर बसवून पाठवायचे होते : सतपाल महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:18 PM2019-04-01T23:18:08+5:302019-04-01T23:19:28+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले. पण विरोधक यातही राजकारण करीत किती दहशतवादी मारले गेले, याचा पुरावा मागत आहेत. या विरोधकांना बॉम्बवर बसवून पाकिस्तानात पाठवायचे होते, तेव्हाच मृतांचा खरा आकडा कळाला असता, अशी टीका उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले. पण विरोधक यातही राजकारण करीत किती दहशतवादी मारले गेले, याचा पुरावा मागत आहेत. या विरोधकांना बॉम्बवर बसवून पाकिस्तानात पाठवायचे होते, तेव्हाच मृतांचा खरा आकडा कळाला असता, अशी टीका उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी केली.
भाजपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या मिनीमातानगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. गडकरी यांच्या प्रचारासाठी पूर्व नागपुरात सोमवारी पारडी बाजार व दर्शन कॉलनीमध्ये सभा घेण्यात आल्या. मिनीमातानगरच्या सभेला आ. कृष्णा खोपडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेविका चेतना टांक, सरिता कावरे, नगरसेवक बाल्या बोरकर, अनिल गेंडरे आदी उपस्थित होते. यावेळी सतपाल महाराज म्हणाले, गडकरी यांनी देशाचे चित्र बदलले आहे. गावापासून शहराला, शहरापासून राज्याला आणि देशाला रस्त्यांनी, जलमार्गाने जोडले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारताचा सर्वांगीण विकास करणारा लोकप्रिय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ख्याती आहे. या लोकनेत्यांची प्रतिष्ठा उंचावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. बायो-फ्युएलवर धावणारी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स कार, बसेस रस्त्यावरून धावत आहेत. जशी लक्ष्मी कमळावर बसून येते तसा विकासही कमळामुळेच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने देशाला स्वाभिमान आणि सुरक्षा प्रदान केली आहे. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार सर्वांसाठीच मोदी सरकारने अतिशय उपयुक्त योजना राबविल्या. पाकिस्तानला धडा शिकवून भारतीय सैन्याचे मनोबल उंचावले. हा देश जगाच्या पाठीवरील कुठल्याही दहशतवादाला आता घाबरणारा नाही हे सिद्ध केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
एक लाख लोकांना पाच लाखात घर : गडकरी
गाव, गरीब, मजूर आणि शेतकरी यांचे कल्याण व्हावे, हेच माझे स्वप्न आहे. शहराच्या आधुनिक विकास होत असताना,
झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे माझे स्वप्न आहे. आतापर्यंत आम्ही १० हजार लोकांना घरकूल उपलब्ध करून दिले आहे. येणाऱ्या काळात एक लाख लोकांना पाच लाखामध्ये त्यांच्या हक्काचे घरकूल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. पुन्हा संधी मिळाल्यास नागपूर हे जगाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कलावंतांना जपणाऱ्या नेत्यामागे राहा : प्रभाकर धाकडे
नागपुरात सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कलावंतांना प्रोत्साहन देण्याची गरज होती, ती नितीन गडकरी यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण केली. त्यामुळे कलावंतावर प्रेम करणाऱ्या नेत्याच्या मागे आगामी निवडणुकीत उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सूरमणी प्रभाकर धाकडे यांनी केले. नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ जवाहर वसतिगृहात सांस्कृतिक आघाडीतर्फे कलावंतांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी गडकरी म्हणाले, कलावंतांना आपल्या क्षेत्रात कायम संघर्ष करावा लागतो. ज्येष्ठांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्यावेळी आर्थिक मदतीची गरज असते. आगामी काळात कलावंतांना येणाऱ्या समस्यांविषयी काम करणार असून, त्याचसोबत नव्या पिढीतील कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणार. आजवर डॉ. देशपांडे सभागृह तसेच नवनिर्मित सुरेश भट सभागृह कलावंतांसाठी अतिशय अल्पदरात उपलब्ध करून देण्याचे काम केले. येत्या काळात अंबाझरी येथे ३० आसनक्षमता असलेले ओपन एअर थिएटर साकारण्याचा मानसही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपाचे राजेश बागडी, प्रा. संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता, ज्येष्ठ कलावंत शक्ती रतन आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे निवृत्त विभागप्रमुख विनोद इंदूरकर यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे संचालन मोहम्मद कलीम यांनी केले. आभार आसावरी तिडके यांनी मानले.