सभागृहातही विरोधकांचा हल्लाबोल, शेतकरी कर्जमाफीवर सरकारची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:23 AM2017-12-13T00:23:25+5:302017-12-13T00:23:49+5:30
- आनंद डेकाटे
नागपूर : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात आक्रमक धोरण अवलंबिले. यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तर परिषदेचे कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आले. परंतु त्यानंतरही विरोधक आपल्या धोरणावर कायम असल्यामुळे संपूर्ण दिवसभराचे कामकाज स्थगित करावे लागले.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळावी असे आक्रमक धोरण अवलंबिले. विरोधी पक्षाच्या सदस्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आसनासमोर जाऊन नारेबाजी करू लागले. या गोंधळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. परंतु विरोधकांच्या नारेबाजीमुळे पहिला प्रश्न व्यवस्थित विचारताही आला नाही. गोंधळ वाढत असल्याने अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. दहा मनिटिानंतर कामकाज सुरू झाले, तेव्हा योगेश सागर हे तालिका अध्यक्ष होते. त्यांनी पहिला प्रश्न पुकारला परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नारेबाजी सुरूच होती.
त्यामुळे ३० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. त्यानंतरही पहिला प्रश्न गोंधळातच आटोपता घेत १५ मिनिटांसाठी पुन्हा कामकाज स्थगित करावे लागते. दुपारी १२.५ मिनिटंनी सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हासुद्धा विरोधकांनी नारेबाजी सुरूच होती.
तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी या गोंधळात सुरुवातीचे सर्व कामकाज पुढे ढकलले. तसेच या गोंधळात एक विधेयक सादर करण्यास सांगून संपूर्ण दिवसाचे कामकाज स्थगित केले.
वडेट्टीवार यांना गोंधळात वाढदिवसाच्या शुभेच्छा
कॉँग्रेसचे नेते व विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांचा मंगळवारी वाढदिवस होता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नारेबाजी करीत होते. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी या गोंधळातच वड्डेटीवार यांचा वाढदिवस असल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आव्हाड यांनी उडविले कागदाचे विमान
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले होते. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन सदस्य नारेबाजी करू लागले होते. यात जितेंद्र आव्हाड अग्रेसर होते. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुरुवातीला आव्हाड यांनी बसून जाण्याची विनंती केली. तर तालिका अध्यक्ष योगेश सागर आसनावर असताना आव्हाड यांनी कागदाचे विमान उडविले. यावरून सागर यांनी त्यांचे नाव घेऊन ‘विमान उडवायचे असेल तर विमानतळावर जा’ असा चिमटा काढला.