नागनदी शुद्धीकरणाला डिसेंट्रलाईज ट्रीटमेंटचा पर्याय; रामनगरला यशस्वी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 10:35 AM2021-02-06T10:35:09+5:302021-02-06T10:35:32+5:30
Nagpur News घरातून निघणारी घाण नदीत पोहचूच नये, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंट्रलाईज सिवेज ट्रीटमेंटचे तंत्र सर्वोत्तम उपाय ठरेल, असा ठाम विश्वास पर्यावरण तज्ज्ञ प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
नागनदी पुनरुज्जीवन परिक्रमा
नागपूर : कोटीच्या कोटी उड्डाणे करूनही चुकीच्या दिशेने वाटचाल करून नागनदी स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रदूषणाचे मूळ स्रोत समजणे व त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. घराघरातून निघणारे सांडपाणी हेच नागनदीच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बाहेर शुद्धीकरणाचे उपाय करण्यापेक्षा घरातून निघणारी घाण नदीत पोहचूच नये, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंट्रलाईज सिवेज ट्रीटमेंटचे तंत्र सर्वोत्तम उपाय ठरेल, असा ठाम विश्वास पर्यावरण तज्ज्ञ प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
विशेष म्हणजे २२ वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा नागनदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हाही सहस्रभोजनी यांच्या ‘इकोसिटी फाऊंडेशन’ने अतिशय कमी खर्चाचे हेच तंत्रज्ञान सुचविले होते आणि त्याचे नियोजन दिल्ली येथे झालेल्या परिषदेत सादरही केले होते. मात्र एखाद्या कंपनीला काम देऊन आपली जबाबदारी झटकणाऱ्या प्रशासकांनी तेव्हाही या आराखड्याकडे दुर्लक्ष केले हाेते. मात्र फाऊंडेशनने हार न मानता त्यांच्या डिसेंट्रलाइज पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरणाचा यशस्वी प्रयाेग केला. रामनगरला त्याचे प्रत्यक्ष अवलाेकन केले जाऊ शकते.
डिसेंट्रलाइज ट्रीटमेंट म्हणजे
डिसेंट्रलाइज काही माेठे तंत्रज्ञान नाही तर घरातील कचरा उचल करण्याप्रमाणे स्वत:चे पाणी स्वत:च शुद्धीकरण करणे हाेय. त्यामुळे सिवेजची घाण नाग नदीत पाेहचणारच नाही आणि स्वच्छ पाणी प्रवाहित हाेईल. वैयक्तिक घर, फ्लॅट स्कीम, माेठी वसाहत, एक किंवा दाेन वस्त्या मिळूनही डिसेंट्रलाइजचे नियाेजन करणे शक्य असल्याचे सहस्रभोजनी यांनी सांगितले. त्यामुळे नदी शुद्धीकरणाच्या नावाखाली एका कंपनीला पैसा देण्यापेक्षा नागरिकांकडे वळता करून तसे नियाेजन करण्यास प्राेत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काय आहे रामनगर पॅटर्न
फाऊंडेशनने रामनगर येथे एका ८ फ्लॅटच्या वसाहतीमध्ये डिसेंट्रलाइजचा प्रयाेग साकार केला आहे. प्रद्युम्न यांनी सांगितले, इमारतीचे सिवेज नेणाऱ्या पाईपला जाेडून १३ चेंबर तयार करण्यात आले. यातील पहिले ६ सेटलिंग चेंबर आहेत. सांडपाणी वरखाली हाेऊन या चेंबरमधून वाहत जाते. यानंतर ४ चेंबरमध्ये अनएराेबिक बिफल रिॲक्टर्सचा वापर केला आहे. पुढे तीन अनएराेबिक फिल्टर चेंबरमध्ये चारकाेलचे बेड तयार केले आहेत. यातून वाहत जाणारे सांडपाणी स्वच्छ हाेऊनच बाहेर निघते. यासमाेर काही विशिष्ट प्रजातीची झाडे लावून उरलेले प्रदूषणही संपविले जाते. पुढे हे शुद्ध पाणी मुख्य सिवर लाईनला जाेडून नाग नदीत प्रवाहित केले जाते. आता शंकरनगरच्या एका वसाहतीमध्येही हे व्यवस्थापन केले जात असल्याचे सहस्रभोजनी यांनी सांगितले.
डिसेंट्रलाइज का आवश्यक?
घरातून निघणारे सिवेज केवळ सांडपाणी नाही तर अनेक प्रकारचे घातक रसायन घेऊन निघत असते. हे रसायन थेट नदीत गेल्यास नैसर्गिक झऱ्यांवर गंभीर परिणाम हाेतात. पाण्यातील ऑक्सिजन नष्ट हाेऊन वनस्पती व जलचर प्राण्यांच्या जैवविविधतेला धाेका पाेहचताे. एकीकडे सिवेजचे रसायन व दुसरीकडे अतिक्रमण यामुळे नैसर्गिक स्रोत नामशेष झाले असून नाग नदीमध्ये आता केवळ घाण वाहत आहे. त्यामुळे सिवेजचे प्रदूषण नदीत पाेहचूच नये म्हणून डिसेंट्रलाइजचा उपाय करणे औचित्याचे ठरेल, असा दावा सहस्रभोजनी यांनी केला.