नागपुरात ऑरेंज अलर्ट; वादळी पावसासह गारा पडण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 01:26 PM2021-03-17T13:26:06+5:302021-03-17T13:26:30+5:30
Nagpur News हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या वादळाचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
१७ ते २० मार्च हे चार दिवस विदर्भात पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, १७ मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या आठ जिल्ह्यांत तुरळक पावसाचा इशारा दिला आहे. १८ व २० मार्चला सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार असून १९ मार्चला विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रति ताशी वेगाचे हे वादळ नुकसान पोहोचवू शकते. यामुळे शेतक?्यांना आणि नागरिकांना हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतक?्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भाजीपाला तसेच आंब्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही सल कायम असतानाच पुन्हा नवे अस्मानी संकट घोंगावत आहे.
सोमवारपासूनच वातावरणात बदल जाणवत आहे. दोन दिवसांपासून आकाश ढगाळलेले असून तापमानातही घट झाली आहे. नागपुरातील मंगळवारचे कमाल तापमान ३७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अमरावती आणि वर्धा येथील तापमान अनुक्रमे ३७.४ व ३७.५ अंश सेल्सिअस होते. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ३९.२ अंश नोंदविले गेले तर सर्वात कमी तापमान गोंदीया येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला, बुलडाणा आणि गडचिरोली येथे ३८ अंश सेल्सिअस तर यवतमाळात ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
.