डोंगराच्या कुशीत अन् जंगलाच्या वेशीत बहरला संत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:12+5:302021-02-05T04:41:12+5:30

अभय लांजेवार उमरेड : उमरेड तालुक्यातील मकरधोकडानजीक असलेल्या जामगड टेकड्यांची ऐतिहासिक नोंद आहे. अशा डोंगराळ भागातील कुशीत अन् जंगलाच्या ...

Orange blossomed in the forest at the foot of the mountain | डोंगराच्या कुशीत अन् जंगलाच्या वेशीत बहरला संत्रा

डोंगराच्या कुशीत अन् जंगलाच्या वेशीत बहरला संत्रा

Next

अभय लांजेवार

उमरेड : उमरेड तालुक्यातील मकरधोकडानजीक असलेल्या जामगड टेकड्यांची ऐतिहासिक नोंद आहे. अशा डोंगराळ भागातील कुशीत अन् जंगलाच्या वेशीत असलेल्या शेतात एका तरुण शेतकऱ्याने दोन एकरात संत्र्याचे विक्रमी उत्पादन घेतले. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीतही त्याने हार पत्करली नाही. विविध संकटाचा मुकाबला करीत यंदा या शेतकऱ्याच्या शेतातील संत्रा बहरला आणि बाजारपेठेतही पोहोचला. गांडुळ आणि शेणखताचा पुरेपूर वापर करीत ‘झिरो बजेट’ शेतीचा मंत्र जोपासत बागायती शेतीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव अत्रस्वामी ऊर्फ आकाश रामभाऊ कोडापे असे आहे. अत्रस्वामी कोडापे याच्याकडे एकूण आठ एकर वडिलोपार्जित शेती आहे. गावापासून सुमारे दोन किलोमीटरचे कठीण अंतर पार करताना घनदाट जंगलातून काट्यागोट्याची वाट काढावी लागते. पाणी, दळणवळण आणि अन्य सोयीसुविधांचा अभाव असतानाही त्याने हिंमतीने काळ्या मातीत जीव लावला. क्षणाक्षणाला धोकाही पत्करला. २० वर्षाच्या तपस्येनंतर तो आता आपल्यासह कुटुंबीयांना सोबतच अन्य शेतकऱ्यांना आत्मनिर्भर कसे बनविता येईल, यासाठी योगदान देत आहे. त्याच्या या परिश्रमात रामभाऊ कोडापे, गीता कोडापे, अरुण कोडापे, सीता कोडापे, ज्योती कोडापे, योगेश कोडापे यांच्यासह कृषिभूषण नारायण लांबट, कृषी अधिकारी बी. सी. फरकाडे, संजय वाकडे यांचा वाटा आहे.

२८० संत्रा झाडे

१९९८ ला अत्रस्वामीने कुटुंबीयांच्या मदतीने बागायती शेतीचा संकल्प केला. केवळ दोन एकराचा प्रयोग केला. या दोन एकरात २८० संत्रा झाडांची लागवड केली. यामध्ये पूर्णत: गांडुळ आणि शेणखताचा वापर केला. २००५ पासून बट्टेदार संत्रा दरवर्षी बहरल्याने परिश्रमाला बळ मिळाले. गतवर्षी त्याने ३० टन उत्पादन घेतले होते. यंदा २५ टन संत्र्याचे उत्पादन नक्की होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा व्हायरसचा जोर अधिक होता, तरीही उत्पादन दमदार झाल्याचे त्यांनी सांगितले.

----

शेतकऱ्यांना बागायती शेतीबाबतची मानसिकता बदलवायची असेल तर नक्कीच अत्रस्वामी कोडापे या युवा शेतकऱ्याकडून बरेच काही शिकता येईल. तालुक्यात मागील तीन वर्षात फळबाग लागवडीकडे कल वाढला असून, १८० हेक्टर क्षेत्रापर्यंत बागायती शेती केली जात आहे.

संजय वाकडे

- तालुका कृषी अधिकारी, उमरेड

Web Title: Orange blossomed in the forest at the foot of the mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.