विदर्भातील संत्रा-मोसंबी, दूध आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्यातीला पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 08:19 PM2021-10-09T20:19:02+5:302021-10-09T20:20:02+5:30

Nagpur News संत्रा-मोसंबी, दूध आणि मत्स्यव्यवसाय हे क्षेत्र निर्यातीला पोषक आहेत. त्यासाठी योग्य नियोजन व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Orange-citrus, milk and fisheries sector of Vidarbha is nutritious for export | विदर्भातील संत्रा-मोसंबी, दूध आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्यातीला पोषक

विदर्भातील संत्रा-मोसंबी, दूध आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्यातीला पोषक

Next
ठळक मुद्देॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या चर्चासत्रात नितीन गडकरी यांनी दाखविली दिशा

 

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांची गरिबी दूर करण्यासाठी त्यांच्या विकासाची गरज आहे. विदर्भात होणाऱ्या उत्पादनात प्रचंड निर्यातक्षमता आहे. मात्र, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. संत्रा-मोसंबी, दूध आणि मत्स्यव्यवसाय हे क्षेत्र निर्यातीला पोषक आहेत. त्यासाठी योग्य नियोजन व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने ‘कृषी उत्पन्न, फळे आणि भाजीपाला क्षेत्रात विदर्भाची निर्यातक्षमता’ या विषयावर शनिवारी एकदिवसीय चर्चासत्र झाले. याचे उद्घाटन गडकरी यांच्यासह अपेडाचे चेअरमन डॉ. एम. अंगामुत्थू, सेंट्रल रिसर्च सिट्रस इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. दिलीप घोष, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, डॉ. आशिष पातुरकर आणि ॲग्रोव्हिजनचे अध्यक्ष रवी बोरटकर यांच्या उपस्थितीत पार पडले.

गडकरी म्हणाले, ऑर्गानिक फार्मिंग आणि कापूस क्षेत्रात कामाची संधी आहे. केवळ उत्पादन वाढून चालणार नाही. निर्यातीसाठी उत्पादनाची गुणवत्ता, प्रोसेसिंग, पॅकेजिंगसाठी प्रशिक्षणाची गरज आहे. संत्रा-मोसंबीसारख्या फलोत्पादनात मोठी संधी आहे. येथील संत्रा थेट बांगलादेशात निर्यात करण्याचे नियोजन आहे. विदर्भातील तलावांचे योग्य नियोजन करून मच्छीमार संस्थांच्या सहकार्याने दिशा मिळावी व आदिवासी क्षेत्रातील निर्यातक्षम उत्पादनांचा अभ्यास करून प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. अपेडाने नागपुरात आपले कार्यालय उघडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक रवी बोरटकर यांनी केले. संचालन ॲग्रोव्हिजन फाउंडेशन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी तर आभार रमेश मानकर यांनी मानले.

अपेडा-सिट्रसने केला करार

चर्चासत्राच्या उद्घाटनादरम्यान अपेडा-सिट्रस यांच्यातील परस्पर तांत्रिक सहकार्यासाठी झालेल्या करारावर अपेडाचे संचालक तरुण बजाज आणि सिट्रसचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी स्वाक्षरी केली.

ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर प्रस्तावित

पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील ५५ एकर जागेवर १५० कोटी रुपयांचे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर प्रस्तावित आहे. येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण, निवासाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. अपेडा तसेच पंजाबराव कृषी विद्यापीठाने मदत केली, तर हे सेंटर लवकरच स्थापन होईल, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.

...

Web Title: Orange-citrus, milk and fisheries sector of Vidarbha is nutritious for export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.