ऑरेंज सिटी स्ट्रीट : 'आरएनसी प्लांट'साठी वर्षभरानंतर दिली जात आहे जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:19 PM2020-01-03T23:19:20+5:302020-01-03T23:20:13+5:30
ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प १५ महिन्यात पूर्ण होणार होता, त्याच्या आरएमसी प्लँटसाठी १२ महिन्यानंतर म्हणजेच वर्षभरानंतर मनपाची जमीन भाड्याने देण्याची तयारी कशी काय केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जर एखाद्यावर मनपा सत्तापक्ष व प्रशासनाची मेहरबानी असेल तर काहीही होऊ शकते. असेच काहिसे ऑरेंज सिटी स्ट्रीट मार्गाच्या सिमेंटीकरणाच्या कामात होत आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मधुकोन प्रोजेक्टा पंचदीपनगर चौक ते जयताळा दरम्यान ५.५० कि.मी. रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम देण्यात आले होते. १५ महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते. परंतु मधुकोन कंपनीला संबंधित प्रकल्पासाठी ७ हजार वर्गफूट जमीन १.३८ लाख रुपये प्रति माह भाड्याने काँक्रिट रेडी मिक्स (आरएमसी) प्लांट)साठी देण्याचा प्रस्ताव पुढील स्थायी समितीच्या बैठकीत येत आहे. तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, जो प्रकल्प १५ महिन्यात पूर्ण होणार होता, त्याच्या आरएमसी प्लँटसाठी १२ महिन्यानंतर म्हणजेच वर्षभरानंतर मनपाची जमीन भाड्याने देण्याची तयारी कशी काय केली जात आहे. ही जमीन ११ महिन्यासाठी मागण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम अजून किमान ११ महिने तरी पूर्ण होणार नाही, हे निश्चित.
मधुकोन प्रोजेक्टला हे काम ५३.१० कोटी रुपयात मुख्यमंत्र्यांच्या विशेष फंडातून देण्यात आले होते. अगोदर चार महिन्यात जयताळाकडून जवळपास एक किमी रस्ता खोदून संंबंधित कंपनीने तसाच सोडून दिला. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित करून ही बाब निदर्शनासही आणून दिली होती. यानंतर कामाला थोडी गती मिळाली. परंतु लेटलतिफीमुळे संबंधित रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे लखनौ-मुजफ्फरपूर नॅशनल हायवे प्रकल्पाचे काम संथ गतीने केल्याबद्दल आणि इतर अनियमितेतमुळे वर्ल्ड बँकने २६ आॅक्टोबर २०१७ रोजी या कंपनीला दोन वर्षासाठी डीबार केले होते. या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त झाला होता.
एनएचएआयने सुद्धा एका प्रकल्पात संथ गतीने काम केल्या प्रकरणात कारवाई केली होती. तरीही मनपाने इतक्या मोठ्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम कंपनीला देण्यात आले. प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनाही या प्रकरणाची माहिती होती. यामुळे मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांची कृपा ज्या कंपनीवर झाली, त्यावर मेहरबानी कायम राहते.
ऑरेंज सिटी स्ट्रीटला अजूनही गती नाही
वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा या दरम्यान ३०.४९ हेक्टर क्षेत्रफळात ऑरेंज सिटी स्ट्रीटचे बांधकाम करावयाचे आहे. वर्धा रोडपासून सीआरपीएफ दरम्यान हा स्ट्रीट मौजा सोमलवाडा, खामला, भामटी, टाकळी, जयताळा असा एकूण २१ भूखंडांमध्ये विभागला आहे. जयप्रकाशनगर चौकातच स्ट्रीट अंतर्गत मेट्रो मॉलचे बांधकाम केले जात आहे. याचे काम मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे. ३३०८ वर्ग मीटर क्षेत्रात मेट्रो मॉलचे काम सुरू झाले. परंतु याची गती अतिशय संथ असल्याने मनपाने हे काम परत घेतले. स्वत:च्या स्तरावर मेट्रो मॉल विकसित करण्याच्या प्रस्तावाला मागच्या स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.