नागपूर व अमरावती येथे संत्रा क्लस्टर : केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 09:43 PM2017-12-17T21:43:48+5:302017-12-17T21:48:00+5:30
शेतकऱ्यांना संत्रा लागवडीचे अद्ययावत तंत्रज्ञान शिकविण्यासाठी, निर्यातक्षम संत्रा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून नागपूर व अमरावती येथे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा), नवी दिल्ली, राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर व राज्य सरकारच्या कृषी विभागात करार झाला आहे. फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर :
नागपूर येथे आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये दुसऱ्या दिवशी रविवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते संत्रा उत्पादनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शेतकरी व शास्त्रज्ञांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ‘यूपीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजूभाई श्रॉफ, ‘यूपीएल’चे ग्लोबल सीईओ जय श्रॉफ, लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा उपस्थित होते. यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), सहप्रायोजक मिनिट-मेड यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हे लोकमत इनिशिएटिव्ह असून १८ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.
यावेळी राधामोहन सिंग म्हणाले, गेल्या काळात कृषी क्षेत्रात जी गुंतवणूक करायला हवी होती ती करण्यात आली नाही. स्वातंत्र्यानंतर सन १९६४ पर्यंत व पुढे १९८० पासून ते सन २००० पर्यंत कृषी क्षेत्रात फारशा सुधारणा झाल्या नाहीत. निवडणुकीत मतांसाठी शेतकरी विकासाचे नारे दिल्याने शेतकरी सशक्त होत नाही, असे म्हणत त्यांनी यापूर्वीच्या सरकारवर नेम साधला. देशात १२ लाख कोटी शेतकरी भूधारक आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या जमिनीचा पोत माहीत नव्हता. देशभरात मृदा तपासणीच्या फक्त १२ हजार प्रयोगशाळा होत्या. आमच्या सरकारने त्या १० लाख केल्या. शेतकऱ्यांला जमिनीची परिस्थिती कळू लागली आहे. २०२२ पर्यंत याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा ३५ टक्के युरिया केमिकल फॅक्टऱ्यांकडे वळविला जात होता. २००५ मध्ये कृषी वैज्ञानिकांनी यावर मार्ग शोधला व नीम कोटेड युरिया तयार करण्याची शिफारस केली. मात्र, पुढील नऊ वर्षे तत्कालीन सरकारने ती लागू केली नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच दीड वर्षात युरिया नीम कोटेड करूनच बाजारात येऊ लागला. यामुळे काळाबाजार थांबला व शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण जीवनात दुधाळू गाय महत्त्वाची आहे. मात्र, देशी गाईची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न झाले नाहीत. गुजरातमध्ये अमूल वाढले, तर महाराष्ट्रात महानंदा का वाढले नाही, असा सवाल करीत त्यांनी या पूर्वीच्या राज्य सरकारवर कटाक्ष केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत मदर डेअरीला विदर्भात आणल्यामुळे काही दिवसात चित्र पालटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
बी.टी. २ बियाणे स्वस्त होणार
कापसाचे बी.टी. १ बियाणे २००२ मध्ये आले. तेव्हापासून संबंधित बियाण्यासाठी कंपनीला रॉयल्टी देण्यात आली. मात्र, केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर हे लक्षात आले की, बी.टी. १ पेटेंटच केले नव्हते. त्यामुळे त्यावरील रॉयल्टी बंद केली. बी.टी. २ बियाणे २००६ मध्ये आले होते. त्यावरही दिली जाणारी रॉयल्टी सरकारने २०१४ मध्ये ५० रुपयांनी कमी केली होती. आता ही रॉयल्टी आणखी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात आपण स्वत: व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठक घेणार असल्याचे राधामोहन सिंग यांनी सांगितले. सरकारने रॉयल्टी कमी करण्याचा निर्णय घेतला तर बी.टी. २ बियाणे आणखी स्वस्त होईल व याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल.
भेदभावामुळे विदर्भ-मराठवाड्याकडील शेतकरी मागासला- विजय दर्डा
राज्याच्या एका भागात पाणीच पाणी आहे तर दुसरीकडे पिकाला एकवेळ देण्यासाठीही पाणी नाही. एकीकडे भरपूर वीज आहे तर दुसरीकडे भारनियमनाचे चटके आहेत. एकीकडे मार्गदर्शनाची साखळी आहे तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा मागमूसही लागू दिला जात नाही. अशा विषमतेमुळे व भेदभावामुळे विदर्भ मागास राहिला व त्यामुळेच येथे सर्वाधिक आत्महत्या झाल्या, असे मत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. संत्रा संशोधनाच्या क्षेत्रात पाहिजे तसे काम झालेले नाही. कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नाही. शेतकऱ्यांचे पुत्रही मोठ्या पदांवर गेले की शेतकऱ्यांना विसरतात, अशी खंत व्यक्त करीत संत्रा उत्पादन, प्रकिया, निर्यात यासह संत्रा टुरिझमलाही महत्त्व देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गरजा समजून उत्पादन व्हावे- जय श्रॉफ
उत्पादन जास्त झाले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत नाही. यावर शेतकरी, उद्योग व सरकारमध्ये चर्चा व्हावी. गरजा समजून उत्पादन घेतले जावे, असे मत ‘यूपीएल’चे ग्लोबल सीईओ जय श्रॉफ यांनी व्यक्त केले. युपीएलचा जगभरातील संत्रा उत्पादकांशी थेट संबंध आहे. संत्रा निर्यातक्षम बनविण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येथील संत्र्याला जगात नावलौकिक मिळवून देण्यासाठी आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये यूपीएल दरवर्षी सहभागी होईल, असेही त्यांनी जाहीर केले.
उत्कृष्ट संत्रा उत्पादक पूरस्कार
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये इंडियन सोसायटी आॅफ सिट्रिकल्चरतर्फे २०१५ पासून दिला जाणारा ‘डॉ. शाम सिंग उत्कृष्ट संत्रा उत्पादक पुरस्कार’ चार जणांना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात पंजाबमधील बलविंदरसिंग टिक्का, मिझोरमचे लालबियाका, आंध्र प्रदेशातील स्वीट आॅरेंज उत्पादक एस.ब्रह्मरेड्डी व जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक रायसिंग सुंदर्डे यांचा समावेश आहे.
उत्कृष्ट संत्रा वैज्ञानिक पुरस्कार
उत्कृष्ट संत्रा वैज्ञानिक या श्रेणीत बलविंदरसिंग टिक्का, डॉ. ए.डी. हुच्चे, डॉ. देवानंद पंचभाई, उत्कृष्ट संत्रा उद्योजक करिता ताज खान, उत्कृष्ट संत्रा उत्पादक श्रेणीत नागपूरचे मनोज जवंजाळ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.