ऑरेंज फेस्टिव्हल; देशविदेशातील कृषितज्ज्ञांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:22 AM2019-01-18T10:22:02+5:302019-01-18T10:22:30+5:30
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादकही सहभागी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादकही सहभागी होणार आहेत. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग व निर्यात यावर विचारांचे आदानप्रदान होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग करण्याचा हा प्रयत्न आहे.
महोत्सवात पहिल्या दिवशी रेशीमबाग मैदानावर ‘आयसीएआर-सीसीआरआय’तर्फे ५० प्रकारचे लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नामांकित शेफ विष्णू मनोहर शेतकऱ्यांसाठी ‘संत्र्याचा हलवा’ आणि संत्र्याच्या सालीपासून ‘मार्मेटेड’ (जॅमसारखा एक प्रकार) तयार करणार आहेत.
नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे आयोजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवात नामांकित घरगुती आणि आंतरराष्ट्रीय कृषी कंपन्यांचे पॅव्हेलियन आणि स्टॉल आहेत. कृषी प्रदर्शनात देशविदेशातील कृषितज्ज्ञांतर्फेसंत्र्याच्या प्रजाती, लागवड, उत्पादन, निर्यातीवर मार्गदर्शन तर संत्र्यावर जागतिक परिसंवाद होणार आहे.
ब्राझील, अमेरिका, टर्की, कम्बोडियाचे तज्ज्ञ
प्रदर्शनात ब्राझील, अमेरिका, टर्की, कम्बोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि दक्षिण कोरिया या देशातील तज्ज्ञांचा समावेश आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि भारताच्या अन्य राज्यातील तज्ज्ञ प्रदर्शनात सहभागी होतील.