नागपुरातील कळमन्यात संत्री ८ ते ३३ हजार रुपये टन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 10:17 PM2019-10-30T22:17:11+5:302019-10-30T22:18:40+5:30
बुधवारी १२५० क्विंटल संत्र्यांची आवक झाली. गुणवत्तेनुसार ८ ते ३३ हजार रुपये टन भावाने संत्र्यांची विक्री झाली. नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचा संत्रा कळमना मार्केटमध्ये येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी आंबिया संत्र्यांचे उत्पादन कमी आहे. गुणवत्तेअभावी शेतकऱ्यांना कमीच भाव मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात एक महिन्यांपासून आंबिया बहार संत्र्याची आवक सुरू आहे. आतापर्यंत ५० हजार क्विंटल आवक झाली असून जानेवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहील. बुधवारी १२५० क्विंटल संत्र्यांची आवक झाली. गुणवत्तेनुसार ८ ते ३३ हजार रुपये टन भावाने संत्र्यांची विक्री झाली. नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचा संत्रा कळमना मार्केटमध्ये येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कळमन्यात भाव कमी असतानाही किरकोळमध्ये संत्रा जास्त भावात विकला जात आहे. सध्या ४० ते ६० रुपये डझन भाव आहेत.
सततचा पाऊस आणि किटकांचा प्रादुर्भाव
नागपुरी संत्री देशात आणि विदेशातही प्रसिद्ध आहेत. यावर्षी विदर्भात ४ लाख टन संत्र्यांचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या पावसामुळे किटकनाशकाचा (पतंग) प्रादुर्भाव झाल्यामुळे दोन तृतीयांश संत्रा खराब झाला असून केवळ अर्धा लाख टन संत्र्याचे उत्पादन येण्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत गेल्यावर्षी ३ लाख टनावर आंबिया संत्र्याचे उत्पादन झाले होते.
आठ दिवसांपासून खरेदी-विक्री कमी
दिवाळीत संत्र्यांची खरेदी-विक्री कमी होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षीही दिवाळीत फार कमी शेतकऱ्यांनी कळमन्यात संत्रा विक्रीस आणला. दिवाळीत व्यापाऱ्यांकडून खरेदी कमी झाल्यामुळे बरेच संत्रे पडून आहेत. दिवाळीत परराज्यातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. दिवाळीनंतर संत्र्याला चांगली मागणी राहील आणि भावही उंचावेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना भाव कमी मिळत असल्यामुळे संत्रानगरीत संत्रा मागणीलाच घरघर लागली आहे.
नागपुरी संत्र्यांना परराज्यात मागणी
आंबिया आणि मृग बहारात नागपुरी संत्र्याला मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक येथून प्रचंड मागणी असते. काही वर्षांपूर्वी काठमांडू, जम्मूलादेखील येथील संत्री रवाना झाले होते. मात्र नोटाबंदीने बाजारातील रोख हिरावल्याने बाहेरील व्यापाऱ्यांनी नागपूरकडे पाठ फिरविली. हीच बाब यावर्षी दिसून येत आहे. त्यांच्याकडून संत्रा खरेदी बंद आहे. परिणामी अनेक क्विंटल संत्री कळमन्यात पडून आहे. त्यामुळे भाव घसरले आहेत. शेतकरी हवालदिल आहेत. पावसामुळे आणि किटकामुळे संत्र्याची गुणवत्ता घसरल्यामुळे काही शेतकऱ्यांचे शेतातून कळमन्यात संत्रा आणण्याचे भाडेदेखील वसूल होत नाही, अशी खंत व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.राजस्थानात किन्नो जातीच्या संत्र्याचे पीक चांगले आहे. त्यामुळे उत्तर राज्यातून मागणी घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
आंबिया बहाराकडे शेतकऱ्यांचा कल
आंबिया बहाराकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रोखीचे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर, काटोल, कोंढाळी, मोहपा या भागात संत्र्यांचे उत्पादन होते. देशाच्या विविध भागातील संत्र्याची येथील बाजार समितीत आवक होते. व्यापाऱ्यांकडून बाजार परिसरातच संत्र्याचे पॅकिंग करण्यात येते. आंबिया बहार संत्र्याला दक्षिणेकडील राज्यांतून आणि रायपूर, दुर्ग, भिलई या भागातून जास्त मागणी असते. बांगला देशातही येथील संत्रा निर्यात केला जातो. त्याकरिता ग्रेडिंग, व्हॅक्सिन यासारखी प्रक्रिया पार पाडली जाते.
मोसंबीला चांगले भाव
यावर्षी मोसंबीचे पीक कमी असून दर्जा चांगला आहे. कळमना बाजारात गुणवत्तेनुसार १४ ते ५२ हजार रुपये टन भाव आहेत. नागपूर जिल्ह्यातून गेल्या एक महिन्यापासून आवक सुरू आहे. बुधवारी ४५० क्विंटल मोसंबीची आवक झाली. आतापर्यंत २५ हजार क्विंटल मोसंबी बाजारात विक्रीसाठी आली आहे. गेल्यावर्षीच्या एक लाख टनाच्या तुलनेत यावर्षी ५० हजार टन उत्पादन येण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी मोसंबीला २५ ते ३० हजार रुपये टन सरासरी भाव मिळाला होता. यावर्षी जास्त भाव मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सततचा पाऊस व कीटकांमुळे संत्र्याचे नुकसान
यावर्षी सततच्या पावसामुळे ५० टक्के संत्र्याची गळती झाल्याने पीक कमी आहे. संत्र्यावर कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रारंभी संत्र्याला कमी भाव मिळाला. आता पाऊस थांबला असून, ३० ते ४५ रुपये टनापर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी विदर्भात साडेतीन लाख टन संत्र्याचे उत्पादन झाले होते. यावर्षी नैसर्गिक आपत्ती आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे केवळ अर्धा लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसला आहे.
श्रीधर ठाकरे, कृषितज्ज्ञ.
दररोज ५० ते ६० टेम्पो संत्र्यांची आवक
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा संत्र्यांची आवक कमी आहे. पण त्याप्रमाणात भाव वाढले नाही. तसे पाहता आंबिया बहार संत्र्यांना नागपुरात मागणी कमी तर दक्षिणेकडील राज्यांकडून जास्त मागणी असते. सततच्या पावसामुळे संत्र्यांवर डाग दिसून येत आहे. दर्जेदार संत्र्याला चांगला भाव मिळेल.
आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,
कळमना फ्रूट मार्केट असोसिएशन.