वाढत्या तापमानाचा फटका; संत्रा गळतीमुळे विदर्भात ५०० कोटींचे नुकसान, शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 10:59 AM2022-05-11T10:59:08+5:302022-05-11T11:04:22+5:30
नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
स्नेहलता श्रीवास्तव
नागपूर : सप्टेंंबर ते डिसेंबर या कालावधीत संत्र्याच्या आंबिया बहार पिकाची यंदा विदर्भातील विविध भागांत ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमान ४० ते ४५ अंशांपर्यंत होते. मागील १०० वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा फटका बसल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.
नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
या संदर्भात कृषी सहसंचालक रवींद्र भोसले म्हणाले, यावर्षी मार्चमध्ये कमालीचे तापमान वाढले. लोडशेडिंगमुळे मर्यादित सिंचन झाले. त्यामुळे तापमानवाढीबरोबरच फळबागांना फटका बसला.
अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनीही फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाल्याचे मान्य केले आहे. हे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी ३० ते ६० टक्के आहे. विभागाने आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे औपचारिक सर्वेक्षण केलेले नाही.
सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे (सीसीआरआय) संचालक डॉ. दिलीप घोष म्हणाले, हवामानामुळे फळे गळणे सामान्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवत आहोत.
हेटी (ता. काटोल) येथील बाळू मालोदे म्हणाले, त्यांच्याकडे १२.५ एकर संत्रा बाग होती, मात्र ५० ते ६० टक्के फळगळतीमुळे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले. दिग्रस येथील शेतकरी प्रमोद तिजारे यांनी ७० टक्के फळगळतीमुळे १५ लाख रुपयांचे तर पुसला (ता. वरुड) गावातील वैभव कंदुलकर आणि डावरगाव येथील सागर चिकटे यांनीही ४० ते ७० टक्के फळांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
अमरावती विभागात संत्रा गळती ५० ते ७० टक्क्यांपर्यंत होती. शासनाने प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी. नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षानुवर्षे एवढे मोठे नुकसान शेतकरी सहन करू शकत नाहीत.
- श्रीधर ठाकरे, संचालक, महाऑरेंज
काही ठिकाणी ३० ते ५० तर काही ठिकाणी ७० ते ८० टक्क्यांपर्यंतचे नुकसान आहे. सरकारने नुकसानीनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये भरपाई द्यावी.
- मनोज जवंजाळ, अध्यक्ष, नागपुरी संत्रा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.
सीसीआरआयच्या शास्त्रज्ञांनी प्रादेशिक हवामान विभागाच्या सहकार्याने नुकसान टाळण्यासाठी संशोधनाद्वारे अशा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत.
- रमेश जिचकार, सीईओ, श्रमजीवी ऑरेंज प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, वरुड