ऑरेंज हलव्याची शेतकऱ्यांना ‘मेजवानी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 07:03 AM2019-01-18T07:03:03+5:302019-01-18T07:05:07+5:30
नामांकित शेफ विष्णू मनोहर संत्र्याचा हलवा आणि सालीपासून जॅमसारखा पदार्थ रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये तयार करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरी संत्री जगभरात प्रसिद्ध आहे. संत्र्याचा ज्यूस, संत्रावडीसह संत्र्यापासून तयार करण्यात येणाऱ्या काहीच पाककृती खवय्यांना माहीत आहेत. पण नामांकित शेफ विष्णू मनोहर संत्र्याचा हलवा आणि सालीपासून जॅमसारखा पदार्थ रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये तयार करणार आहे. फेस्टिव्हलमध्ये शेतकऱ्यांचे स्वागत हलव्याने होणार असून शेतकऱ्यांसाठी ही एक मेजवानी ठरणार आहे.
लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी ३ पासून विष्णू मनोहर संत्र्यापासून हलवा तयार करण्यास प्रारंभ करणार आहे. विष्णू मनोहर म्हणाले, ७०० किलो संत्र्याचा हलवा तयार करण्यात येणार आहे. पाककृती दुपारी ३ पासून सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहील. हलवा तयार करण्यासाठी २५०० संत्री, ५० किलो रवा, ५० किलो साखर, १५० किलो ऑरेंज क्रॅश (साखर व संत्र्याचा रसापासून तयार केलेला पाक), ५० किलो शुद्ध तूप, ५० लिटर दूध, १० किलो काजू आदी सामग्रीचा उपयोग होईल. हलवा तयार करण्यासाठी कराड येथून खास कढई मागविण्यात आली आहे. अॅल्युमिनियम धातूच्या कढईचे वजन १२० किलो असून ८ बाय ८ रुंद आणि ३ फूट खोल आहे. हलवा विशेष पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. प्रारंभी संपूर्ण संत्र्यातून बिया काढण्यात येणार आहे. यावेळी संत्र्याच्या सालीपासून मार्मटेड (जॅमसारखा एक प्रकार) तयार करण्यात येणार आहे. या पदार्थाला ब्रेडला लावून खाता येईल. हलव्याचे वाटप शेतकरी आणि लोकांना नि:शुल्क करण्यात येणार आहे. सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांनी मंचच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख मनोहर यांनी केला.
विष्णू मनोहर यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रमाची नोंद आहे. वर्ष-२००२ मध्ये सखी मंचसोबत नागपुरात ५ बाय ५ फूट आकाराचा पराठा तयार केला होता. शिवाय नागपुरातच ९ फुटाचा कबाब, ५३ तासाचा कुकिंग रेकॉर्ड, ३ हजार किलो खिचडी आणि जळगांव येथे ३५०० किलो वांग्याचे भरीत, दिल्ली येथे ५ हजार किलोची खिचडी तयार केली होती. याशिवाय १० फेब्रुवारीला विष्णूजी की रसोई येथे सेंद्रीय भाज्या आणि सामग्रीपासून १५०० किलो करी तयार करणार आहेत.