नागपूर जिल्ह्यात भाव काेसळल्याने संत्री झाडावरच; विकण्यापेक्षा फेकणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:41+5:302020-12-11T10:44:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर: संत्र्याच्या अंबिया बहाराच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. भाव काेसळल्याने व्यापारी संत्री खरेदी करायला तयार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: संत्र्याच्या अंबिया बहाराच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. भाव काेसळल्याने व्यापारी संत्री खरेदी करायला तयार नाही. दुसरीकडे, संत्री ताेडून ती बाजारात विकायला नेणे व मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने ते शेतकऱ्यांना परवडत नाही. बागा वाचविण्यासाठी संत्री ताेडणे अनिवार्य असल्याने शेतकरी ताेडलेली संत्री उकिरड्यावर फेकत आहेत.
नरखेड तालुक्यात १०,७१२ हेक्टरमध्ये संत्र्याच्या बागा आहेत. तालुक्यातील सावरगाव, नरखेड, बेलाेना, माेवाड, खैरगाव, जलालखेडा, मेंढला, लाेहारीसावंगा, भारसिंगी, भिष्णूर या भागात संत्रा बागांचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी अति पाऊस व जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने बागांवर राेगाचा प्रादुर्भाव झाला हाेता. त्यातच परतीचा पाऊस रेंगाळल्याने हंगाम थाेडा लांबला.
बाजारात संत्र्याची आवक वाढल्याने तसेच त्यावर प्रक्रिया करण्याची प्रभावी साेय नसल्याने संत्र्याचे दर दिवसेंदिवस खाली येत आहेत. काही भागात व्यापारी अत्यंत कमी दरात संत्र्याची खरेदी करीत असल्याचे तर काही भागात ते फिरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी तालुक्यातील कपाशी, साेयाबीन व माेसंबीसाेबत संत्र्याचे पीकही हातचे गेले आहे. त्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र, एकही लाेकप्रतिनिधी यावर बाेलायला आणि प्रशासन प्रभावी उपाययाेजना करायला तयार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, सर्वेक्षण करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे.
सात हजार रुपये टन भाव
संत्र्याचा उत्पादन खर्च १२ ते १४ हजार रुपये प्रति टन असला तरी संत्र्याला सध्या बाजारात ६ ते ७ हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्री ताेडून बाजारात विकायला नेली तर त्यांना प्रति टन ६ ते ७ हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड साेसावा लागणार आहे. राेग व किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी लागल्याने यावर्षी संत्राचा उत्पादन खर्च वाढला आहे. शेतकरी आता संत्री विकण्यापेक्षा बागा जगवण्याला प्राधान्य देत झाडाची संत्री ताेडून फेकत आहे.
नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन नरखेड तालुक्यात केले जाते. शासनाच्या ‘किसान रेल-२०२०’चा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. येत्या काही दिवसात मृग बहाराचा संत्रा बाजारात येणार आहे. शासनदरबारी सुरू असलेली संत्र्याची उपेक्षा संपायला पाहिजे.
- हिंमत नखाते,
संत्रा उत्पादक, सिंदी (उमरी)