भाव काेसळल्याने संत्री उकिरड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:00+5:302020-12-08T04:09:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली ...
लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली नाहीत. बाजारात संत्र्याचे भाव काेसळल्याने संत्री बाजारात विकायला आणणे शक्य नसल्याचे तसेच व्यापारी खरेदी करायला तयार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काहींनी झाडे जगवण्यासाठी बागेतील संत्री ताेडून ती उकिरड्यावर फेकायला सुरुवात केली आहे. कळमेश्वर तालुक्यातील काही राेडच्या बाजूला संत्र्याचे ढीग पडले असल्याचे दिसून येते.
तालुक्यात १५,६०० हेक्टरमध्ये संत्र्याच्या बागा आहेत. माेहपा, मांडवी, काेहळी, म्हसेपठार, पिपळा (किनखेडे), खुमारी, झुणकी, सिंधी, पारडी (देशमुख), डाेरली, सेलू, केतापार, लाेणारा या भागात संत्रा बागांचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी परतीचा पाऊस विदर्भात रेंगाळल्याने शेतकऱ्यांना संत्री ताेडून बाजारात आणायला किमान एक महिना उशीर झाला. याच काळात केंद्र शासनाने ‘किसान रेल २०२०’ ही याेजना अमलात आणली. या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील संत्री बांगलादेशात रेल्वेद्वारे निर्यात करण्यात आली. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही.
बाजारात आवक वाढल्याने तसेच प्रक्रिया उद्याेगाचा अभाव असल्याने संत्र्याचे भाव काेसळले. व्यापारी संत्री खरेदी करायला तयार नाही. काही व्यापारी कवडीमाेल भावाने संत्री विकत घेत असल्याची माहिती संत्रा उत्पादकांनी दिली. बाग जगवण्यासाठी झाडांवरील संत्री ताेडावी लागत आहेत. ती खरेदी करायला कुणी नसल्याने नाईलाजास्तव राेडलगत किंवा उकिरड्यावर फेकावी लागत आहेत, असेही काहींनी सांगितले. या गंभीर प्रकाराबाबत लाेकप्रतिनिधी व प्रशासन काहीही बाेलायला किंवा उपाययाेजना करायला तयार नाही, असेही संत्रा उत्पादकांनी सांगितले.
----
७ ते ८ हजार रुपये टन भाव
संत्र्याचा उत्पादनखर्च प्रति टन ११ ते १२ हजार रुपये आहे. सध्या बाजारात संत्र्याला ७ ते ८ हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. त्यामुळे संत्र्याचा उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडले आहेत. संत्रा बागा जगवण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी शेतकरी माेठ्या प्रमाणात पीककर्ज घेतात. संत्र्याचे भाव काेसळल्याने तसेच साेयाबीन व कपाशी ही पिके हातची गेल्याने पीक कर्जाचा भरणा करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.