विदर्भातील संत्र्याची चीनला निर्यात करता येणार
By कमलेश वानखेडे | Published: October 5, 2024 04:58 PM2024-10-05T16:58:51+5:302024-10-05T17:00:01+5:30
आशिष देशमुख : काटोल येथे हॉर्टीकल्चर कॉलेज
नागपूर : बांगलादेशमध्ये संत्रा निर्यात करण्याला फार अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेथील सरकारने अवाजवी आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे आपल्या भागातील संत्रा चीनला जावा या उद्देशाने सकारात्मक प्रस्ताव कृषी विभागाने महाराष्ट्र सरकारला आणि त्यानंतर केंद्र सरकारला पाठवलेला आहे. वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. विदर्भातील संत्रा चीनला जाण्याच्या दृष्टीने देशाच्या प्रोटोकॉलमध्ये चीनचा समावेश व्हावा, यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी दिली.
देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत नुकतेच मुंबई मंत्रालय येथे आयोजित बैठकीत विदर्भातील संत्रा-मोसंबी, कापूस-सोयाबीन प्रश्नांसंबंधात चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय झाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हॉर्टीकल्चर कॉलेज काटोल तालुक्यात सुरू करण्यासाठी कृषी विद्यापीठाने परवानगी दिलीच होती पण महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी सुद्धा परवाच याबाबतीत परवानगी दिली आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्याची अनुमती मिळणार आहे.
'वसंतदादा शुगर इंस्टिट्युट' च्या धर्तीवर राज्यात सिट्रस इस्टेट चालु करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली व हा निर्णय लवकरात लवकर अमंलबजावणी करण्याच्या संबंधितांना सुचना देण्यात आल्या. जुलै- ऑगस्टमध्ये संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या संत्रा मोसंबी बागांचे सर्वेक्षण करून हेक्टरी ५० हजार रु आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला मनोज जवंजाळ, महादेव नखाते, अंगद बैसवार, कृष्णा डफरे आदी उपस्थित होते.