फळबाग शास्त्रज्ञांनी केली फळगळीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:16+5:302021-08-27T04:13:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : काटाेल व नरखेड तालुक्यात संत्रा व माेसंबीची माेठ्या प्रमाणात फळगळ हाेत असल्याने गुरुवारी सीसीआरआय ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : काटाेल व नरखेड तालुक्यात संत्रा व माेसंबीची माेठ्या प्रमाणात फळगळ हाेत असल्याने गुरुवारी सीसीआरआय (सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) व पीडीकेव्ही (डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेला) यांच्या फळबाग शास्त्रज्ञांनी गुरुवारी (दि. २६) काटाेल व नरखेड तालुक्यातील संत्रा व माेसंबीच्या काही बागांची पाहणी केली. यावेळी या फळबाग शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना काही उपाययाेजना सुचविल्या.
या संयुक्त पाहणी दाैऱ्यात सीसीआरआयचे फळबाग शास्त्रज्ञ डॉ. अंबादास हुच्चे, डॉ. आशिष दास, डॉ. हरीश सवाई, पीडीकेव्हीचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. देवानंद पंचभाई, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. रमाकांत गजभिये, प्रादेशिक फळसंशाेधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे, उद्यानविद्यावेत्ता डॉ. योगेश धार्मिक सहभागी झाले हाेते.
या फळबाग शास्त्रज्ञांनी फळगळ हाेत असलेल्या काटाेल तालुक्यातील पारडी, ढवळापूर, खापरी (केणे), नायगाव (ठाकरे) तसेच नरखेड तालुक्यातील झाेलवाडी, उमठा या शिवारातील बागांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व उपाययाेजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या दाैऱ्यात विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भाेसले, अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांच्यासह काटाेल, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील प्रमुख संत्रा व माेसंबी उत्पादक शेतकरी सहभागी झाले हाेते.
...
या उपाययाेजना करा
संत्रा व माेसंबीची फळगळ राेखण्यासाठी वाढ होणाऱ्या आंबिया बहराच्या संत्रा व मोसंबी फळझाडांसाठी शिफारस केलेल्या एक किलाे डीएपी व सूक्ष्म अन्नद्रव्ये (१५० १५० ग्राम झिंक सल्फेट) द्यावे. पावसात तीन-चार दिवसाचा सलग खंड पडल्यास जीए-३ १.५ ग्राम, कॅल्शिअम नायट्रेट १.५ किलो, १५ ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, पंधरा दिवसांनी टू-फाेर-डी किंवा एनएए १.५ ग्रॅम, ३०० ग्राम, बोरिक ॲसिड,थायोफनेट मिथाइल/कार्बेंडाझिम १०० ग्राम, मोनोपोटॅशिअम फॉस्फेट (००:५२:३४) १.५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवसवे, सलग तीन चार दिवस पाऊस लागून आल्यास झाडांवर ॲलिएट २.५ ग्रामची फवारणी करावी. गरज पडल्यास दुसरी फवारणी मेटालॅक्झील व मॅनकोझेब या बुरशीनाशकांची फवारणी करावी, असा सल्लाही फळबाग शास्त्रज्ञांनी दिला.