गोसेखुर्दसाठी ५१० एकर भूसंपादनावर जैसे थे आदेश
By admin | Published: May 9, 2015 02:23 AM2015-05-09T02:23:27+5:302015-05-09T02:23:27+5:30
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या अड्याळ गावातील (ता. पवनी) ५१० एकरचे भूसंपादन...
नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या अड्याळ गावातील (ता. पवनी) ५१० एकरचे भूसंपादन व त्यासाठी पारित झालेल्या ४० कोटीवर रुपयांच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने याप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र परिक्षेत्र प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार यांनी रिट याचिका दाखल केली आहे. अड्याळ येथे २०११ पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दरम्यान, शेकडो शेतकऱ्यांची ५१० एकर जमीन संपादित करण्यात आली. ३० आॅक्टोबर २०१४ रोजी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी ४० कोटी २६ लाख १९ हजार ३१६ रुपयांचा निवाडा पारित केला. याचिकाकर्त्याचा यावर आक्षेप आहे. याचिकाकर्त्यानुसार, भूसंपादन व निवाड्यात अनियमितता झाली आहे.
शासनाने जमीन अधिग्रहण कायद्यातील बंधनकारक तरतुदींचे पालन केलेले नाही. नवीन भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्यात आलेला नाही. ओलिताच्या जमिनीला कोरडवाहू जमीन दाखवून कमी मोबदला देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)