वीज बिल थकीत असल्याने संपत्ती जप्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 09:28 PM2019-03-26T21:28:29+5:302019-03-26T21:47:13+5:30
वीज बील थकीत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने रामबाग येथील एका ग्राहकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीची चमू कारवाईसाठी गेली तेव्हा संबंधित ग्राहकाने कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे एसएनडीएलने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज बील थकीत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने रामबाग येथील एका ग्राहकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीची चमू कारवाईसाठी गेली तेव्हा संबंधित ग्राहकाने कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे एसएनडीएलने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
एसएनडीएलने दिलेल्या माहितीनुसार संबंधित वीज कनेक्शन अनिल वामनराव इलमकरच्या नावावर आहे. इलमकर यांनी अनेक दिवसांपासून वीज बिल भरलेले नाही. त्यांच्यावर ४६,५२६ रुपये वीज बील थकीत झाले आहे. २०१४-१५ मध्ये अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एसएनडीएलने लोक अदालतमध्ये याचिका दाखल केली होती. लोक अदालतने एसएनडीएलच्या बाजूने निर्णय देत ग्राहकाला थकीत बिलाची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. परंतु इलमकरने रक्कम भरली नाही. यावर एसएनडीएलने सिव्हील कोर्ट (सिनियर डिव्हीजन)मध्ये दाद मागितली. न्यायालयाने संबंधित ग्राहकाची चलसंपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्ट बेलिफ मंगळवारी संबंधित ग्राहकाकडे गेला. तेव्हा ग्राहकाने जप्तीच्या कारवाईचा विरोध केला. एसएनडीएल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इलमकरने आपल्या समर्थकांना बोलावून घेतले. मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी झाल्याने कारवाई करायला गेलेल्या चमूला परत यावे लागले.