जगदंबा अॅग्रोला बियाणे विक्रीबंदीचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:10+5:302021-05-26T04:08:10+5:30
कळमेश्वर : शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कृषी केंद्रांना बियाणे विक्री करावयाची असताना तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालक स्वमर्जीने विक्री करीत ...
कळमेश्वर : शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कृषी केंद्रांना बियाणे विक्री करावयाची असताना तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालक स्वमर्जीने विक्री करीत असल्याने कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाने मोहपा येथे जगदंबा अॅग्रोची तपासणी केली असता त्यांना त्रुटी आढळून आल्याने या केंद्राला विक्रीबंदीचा आदेश दिला आहे. खरीप हंगाम २०२१-२२ च्या अनुषंगाने कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून योग्य त्या निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यात कृषी भरारी पथकाची स्थापना करून पथकाच्या माध्यमातून कृषी केंद्राची तपासणी सुरू आहे. तालुक्यात ७८ कृषी निविष्ठाधारकांची संख्या असून यामध्ये ६९ खासगी व ९ सहकारी केंद्र आहेत. या तपासणीदरम्यान मोहपा येथील जगदंबा अॅग्रोची तपासणी केली असता काही त्रुटी आढळून आल्या. यात कापूस बियाण्यांची विक्री ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जून २०२१ पासून करावयाची होती. परंतु जगदंबा अॅग्रोने २४ मेपासूनच कापूस बियाण्यांची विक्री केली असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. यामुळे सदर कृषी केंद्राला विक्री बंदचा आदेश देण्यात आला. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी दीपक जंगले यांनी केली.