इमामवाडा, घाट रोड आगाराच्या एकत्रीकरणाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:36 AM2019-08-13T00:36:25+5:302019-08-13T00:38:15+5:30

इमामवाडा आगाराचे घाट रोड येथील आगारात एकीकरणाचे आदेश काढण्यात आले आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचे काय करणार, अशी चर्चा एसटीच्या वर्तुळात सुरू आहे. या जागेवरून एसटी कर्मचारी संघटनांचे प्रशासनासोबत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Order for consolidation of Imamwada, Ghat Road ST depot | इमामवाडा, घाट रोड आगाराच्या एकत्रीकरणाचा आदेश

इमामवाडा, घाट रोड आगाराच्या एकत्रीकरणाचा आदेश

Next
ठळक मुद्देमोक्याची जागा होणार रिकामी : जागेबाबत महामंडळात उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाडा आगाराचे घाट रोड येथील आगारात एकीकरणाचे आदेश काढण्यात आले आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचे काय करणार, अशी चर्चा एसटीच्या वर्तुळात सुरू आहे. या जागेवरून एसटी कर्मचारी संघटनांचे प्रशासनासोबत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाचे एकूण आठ आगार आहेत. यामध्ये शहरातील वर्धमाननगर, घाट रोड, गणेशपेठ, इमामवाडा या आगारासह ग्रामीण भागातील रामटेक, सावनेर, उमरेड, काटोल या आगारांचा समावेश आहे. काही आगारात प्रवासी बस वाहतूक केली जाते, तर काही आगारामध्ये बसेसच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. नागपूर शहर बससेवा पूर्वी एसटीकडे होती. त्यावेळी शहरात धावणाऱ्या बसेसची इमामवाडा आगारात देखभाल-दुरुस्ती होत होती. कालांतराने महापालिकेने शहर बससेवा खासगी कंपनीकडे दिल्यानंतर इमामवाडा हे आगार ग्रामीण भागातील बसेसच्या देखभालीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. मात्र काही दिवसाअगोदर एसटी महामंडळाने प्रशासकीय खर्च कमी करण्याच्या नावाखाली हे आगार घाट रोड आगारात एकत्रीकरणाचे आदेश काढले आहे. त्यात कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना इतरत्र बदली करण्यासह देखभाल-दुरुस्तीसाठीची यंत्रेही इतरत्र हलविण्याबाबत सांगण्यात आले आहे. यामुळे एकीकरणाचे आदेश काढून जमिनीचे काय साधणार आहे. यावरून रिकाम्या जागेचे काय करणार, याबाबत एसटीच्या वर्तुळात चर्चा सुरु आहे. इमामवाडा आगार खाली करताना रिक्त झालेल्या जागेबाबत आणि घाट रोड येथील आगारातील दैनंदिन कामकाज, आगाराचे स्थलांतर झाल्यानंतर होणारे बदल, इमामवाडा आगारात असलेला यांत्रिकी प्लान्ट, चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांची अन्य आगारात बदली, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच एकीकरण झाल्यानंतर होणारा फायदा-तोटा याविषयी मुख्यालयातून एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांना अभिप्राय मागविण्यात आला आहे. याबाबत विभाग नियंत्रकांना संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Order for consolidation of Imamwada, Ghat Road ST depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.