नागपूर ग्राहक मंचचा आदेश : तीन लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:01 AM2018-11-10T01:01:30+5:302018-11-10T01:03:11+5:30
महिला ग्राहकाला तीन लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि त्यांना भरपाई म्हणून ४० हजार रुपये देण्यात यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आकार कन्स्ट्रक्शन ग्रुप व दोन भागीदारांना दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला ग्राहकाला तीन लाख रुपये १५ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि त्यांना भरपाई म्हणून ४० हजार रुपये देण्यात यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आकार कन्स्ट्रक्शन ग्रुप व दोन भागीदारांना दिलेत.
वर्षा गायकवाड असे पीडित ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या तीन लाख रुपयांवर १२ आॅक्टोबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंतच्या कालावधीत व्याज लागू करण्यात आले आहे. तसेच, त्यांना भरपाईमध्ये शारीरिक-मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. ग्रुपच्या भागीदारांची नावे राहुल देशमुख व अच्युत गाडगे आहेत. ग्रुप व भागीदारांना वैयक्तिकरीत्या किंवा संयुक्तरीत्या या निर्णयावर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
गायकवाड यांच्या तक्रारीतील माहितीनुसार, त्यांनी ग्रुपच्या हिरल रेसिडेन्सी योजनेमध्ये ३० लाख रुपयांत सदनिका खरेदी करण्याचे ठरवले होते. त्याकरिता त्यांनी ५ आॅक्टोबर २०१५ रोजी ५० हजार तर, १२ आॅक्टोबर २०१५ रोजी २ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश ग्रुपला दिला होता. त्यानंतर १५ आॅक्टोबर २०१५ रोजी गायकवाड व ग्रुपमध्ये सदनिका विक्रीचा करार झाला. गायकवाड उर्वरित रकमेचे कर्ज घेणार होत्या. त्यामुळे त्या स्टेट बँकेकडे गेल्या असता त्यांना योजना कायद्यानुसार नसल्यामुळे कर्ज मंजूर होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, त्यांनी ग्रुपला जाब विचारला असता स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शेवटी त्यांनी ग्रुपला तीन लाख रुपये व्याजासह परत मागितले. परंतु, ग्रुपने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १२ अंतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला.