विम्स रुग्णालयाला २.६४ लाख परत करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:41+5:302021-05-21T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामठी मार्गावरील विम्स रुग्णालयाने एका कोरोना रुग्णाकडून जादा बिल घेतल्याची तक्रार केल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी मार्गावरील विम्स रुग्णालयाने एका कोरोना रुग्णाकडून जादा बिल घेतल्याची तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्राथमिक तपासानंतर दोन लाख ६४ हजार ५४० रुपये दोन दिवसांत परत करण्याचे आदेश दिले आहे. शिवाय रुग्णालयाने रुग्णाची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी सदर पोलीस ठाण्यात महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी तक्रार दिली.
वर्धा मार्गावरील जयेश साखरकर यांच्या वडिलांना कोरोनामुळे विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यापूर्वी रुग्णालयाने मागणी केल्यानुसार साडेचार लाख रुपये दिले. दोन दिवस आयसीयूमध्ये आणि दोन दिवस ऑक्सिजन बेडवर उपचार करण्यात आल्यानंतर प्रकृती ठीक असल्यामुळे सुटी देण्यात आली.
सुटी देताना रुग्णालयाने फार्मसीचे एक लाख १९ हजार २१८ रुपयांचे देयक दिले. रुग्णालयात दाखल असताना वेळोवेळी रोख देऊन औषध घेतल्यानंतरही इतके पैसे कसे झाले, अशी विचारणा करण्यासाठी गेले असता रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेश सिंघानिया यांनी ५० हजार रुपये देऊन टाका, असे सांगितले. आधीच साडेचार लाख अग्रीम रक्कम दिली असताना आता पुन्हा ५० हजार रुपये देण्यास सांगितल्यावर साखरकर यांनी रुग्णालयाकडे देयके मागितली असता सिंघानिया यांनी देयके देण्यास नकार दिला. या संदर्भात जयेश साखरकर यांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली आणि डॉक्टरांसोबत झालेल्या संवादाचे पुरावे दिले. जोशी यांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे तक्रार केली. अखेर ऑडिटरच्या माध्यमातून प्राथमिक चौकशी करीत रुग्णाचे दोन लाख ६४ हजार ५४० रुपये रुग्णालयाने परत करावेत, असे निर्देश देण्यात आले. अन्य रुग्णालयांसंदर्भात पुराव्यासह तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी माहिती निर्भय जैन यांनी दिली.
....
इतर रुग्णालयांवर कारवाई करणार का ?
विम्स रुग्णालयाने साखरकर या रुग्णांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र सदर पोलीस ठाण्यास देण्यात आले. शहरातील अन्य खासगी रुग्णालयासंदर्भात अशाच तक्रारी आहेत. त्यांच्यावर महापालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून काय कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.