नागपुरातील भाजप नगरसेवकांना ‘रिपोर्ट कार्ड’ सादर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:16 AM2018-02-14T10:16:52+5:302018-02-14T10:20:01+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभराचे ‘रिपार्ट कार्ड’ सत्तापक्ष नेते यांच्याकडे सादर करा, असे निर्देश भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महापालिकेत विक्रमी बहुमत असूनही बहुसंख्य नगरसेवकांचे विकास कामांकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागातील नागरिक नाराज आहेत. याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानसभा क्षेत्रनिहाय भाजपा नगरसेवकांचा वर्षभरातील कामकजाचा आढावा घेण्यात आला. यात अनेकांची कामगिरी चांगली नसलेल्यांना धारेवर धरून पक्ष आदेशानुसार सर्वांना काम क रा, बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. गेल्या वर्षभराचे ‘रिपार्ट कार्ड’ सत्तापक्ष नेते यांच्याकडे सादर करा, असे निर्देश भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिले.
गणेशपेठ येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयात विधानसभा क्षेत्रनिहाय तब्बल सहा तास बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपेंद्र कोठेकर,भोजराज डुम्बे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी थेट नगरसेवकांशी संवाद साधला.
वर्षभरात पक्षाच्या बैठकांना नगरसेवकांची उपस्थिती, पक्ष संघटना बळकट करण्यात असलेले योगदान, महापालिका सभागृहातील योगदान याचा आढावा घेण्यात आला. पक्षाच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्यांना असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी देण्यात आली. पुढील वर्षात लोकसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभा निवडणूक मुदतपूर्व झाल्यास निवडणुकीसाठी सज्ज असले पाहिजे. याचा विचार करता नगरसेवकांनी प्रभागातील बूथचे पालक त्व स्वीकारून नागरिकांशी संपर्क वाढवावा, असा सल्ला देण्यात आला.
मते कमी पडल्यास नगरसेवक जबाबदार
प्रभागातील बूथच्या पालक त्वाची जबाबदारी नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे. बूथनिहाय कामाला लागा, पक्ष संघटना बळकट करा. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना प्रभागातील बूथवर मते कमी पडल्यास नगरसेवकांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
महिलांनी कामकाजात सहभाग घ्यावा
महापालिका सभागृहात भाजपाच्या बहुसंख्य नगरसेविका बोलत नाही. त्यांनी सभागृहात बोलावे. आपल्या प्रभागातील समस्या उपस्थित करून कामकाजात सहभाग घ्यावा. पक्षाच्या व्यासपीठावरही महिलांनी आपली बाजू मांडली पाहिजे, असा सल्ला देण्यात आला.
पक्षशिस्त म्हणून राजीनामे
पक्षशिस्तीचा कुणी भंग केल्यास कारवाई करता यावी, यासाठी १५ दिवसांपूर्वी भाजपा नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले़ मात्र राजीनामे घेतल्याने अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती़ बैठकीत अशा नगरसेवकांची समजूत काढण्यात आली़ पक्षशिस्तीचा हा भाग असल्याचे सांगण्यात आले़. तसेच नगरसेवकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बैठकीत थेट संवाद
विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठकीत शहर अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधला. सभागृहातील कामाकाजात सहभाग, प्रभागातील विकास कामे, पक्षाचे कार्यक्रम व बैठकांना उपस्थिती याची माहिती घेण्यात आली. पक्ष संघटनेत अनेक नगरसेवकांचे योगदान नसल्याने त्यांना जाब विचारण्यात आला.
सभागृहातील ‘मौनव्रत’ सोडा
भाजपाचे काही मोजके नगरसेवक सोडल्यास बहुसंख्य नगरसेवक सभागृहात मौनव्रत धारण करतात. प्रभागातील समस्या सभागृहात मांडत नाही. यामुळे नागरिकांत नाराजी आहे. नगरसेवकांनी प्रभागातील समस्या सभागृहात मांडल्या पाहिजेत. पक्षातील अंतर्गत वाद खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
पतीराजांचा कामकाजात हस्तक्षेप नको
नगरसेवकांच्या कामाबाबतही नागरिकांच्या तक्रारी असलेल्यांना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी तंबी दिली़ तसेच काही नगरसेविकांचे पतीच प्रभागात फिरतात़ यामुळे उलटसुलट चर्चा होते. अधिकारीही नाराजी व्यक्त करतात. महिला नगरसेविकांनी आता सक्रिय व्हावे, असे बजावण्यात आले़ दरम्यान, बैठकीला नगरसेविकांसह काहींचे पतीही आले होते़ मात्र पतींना बाहेर थांबविण्यात आले होते़