नागपूर शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे आदेश; चौकाचौकात सिग्नलवर होर्डिंग
By गणेश हुड | Published: January 30, 2024 02:56 PM2024-01-30T14:56:57+5:302024-01-30T14:57:17+5:30
मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूर : नागपूर शहरातील चौक, वर्दळीच्या रस्त्यांवर,ट्राफीक सिग्नल, विद्युत पोल, ट्रान्सफार्मर इत्यादीवर जागोजागी अवैध होर्डिंगची भरमार आहे. महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहे.
विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध जाहिराती, घोषणा, फलक, हॉडिंग व पोस्टर्स, तोरण हटविण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असून अवैध होर्डिंग हटविण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहेत.