'इन्स्टा’वरुन ड्रग्जच्या ऑर्डर्स अन् कुरिअरने डिलिव्हरी; देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक खुलासा
By योगेश पांडे | Published: December 12, 2023 11:29 PM2023-12-12T23:29:43+5:302023-12-12T23:30:06+5:30
'नायजेरियन तस्कर तर जाणूनबुजून करवून घेतात अटक'
नागपूर: विधानपरिषदेत अमली पदार्थांच्या तस्करीचा विषय चांगलाच गाजला व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत धक्कादायक खुलासेदेखील केले. ही तस्करी म्हणजे एकप्रकारे देशावरील हल्लाच आहे. एक मोठे सिंडिकेट यामागे काम करते व अनेकदा तर ‘डार्क नेट’ व ‘इन्स्टाग्राम’सारख्या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सवरून हे रॅकेट चालते. तेथूनच ऑर्डर घेतल्या जातात व थेट कुरिअरने डिलिव्हरी होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान या मुद्द्यावर फडणवीस यांनी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत सखोल माहिती दिली. कुरिअरमधून अमली पदार्थांची डिलिव्हरी होत असल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर आता कुरिअर कंपन्यांना विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पोलिस विभागाकडून देखील अकस्मात तपासणी करण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
- नायजेरियन कैद्यांसाठी डिटेंशन सेंटर
अमली पदार्थांच्या तस्करीत नायजेरियन नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. मागील काही काळात राज्यात १७४ जणांना पकडण्यात आले. मात्र, नायजेरियातील या लोकांना ही कारवाई किंवा तात्पुरती अटक हवी असते. एकदा गुन्हा दाखल झाला की नियमांनुसार त्यांना खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या देशात थेट ‘डिपोर्ट’ करता येत नाही. याचा फायदा ते लोक उचलतात व परत रॅकेट सुरूच ठेवतात. त्यामुळे आता या लोकांना कारवाई झाल्यावर डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबईत एक केंद्र उभारण्यात आले आहे व इतरही केंद्र उभारण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
- मुंबईतील हुक्का पार्लर्स बंद करा
यावेळी हुक्का पार्लर्सच्या माध्यमातून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला. ही पार्लर्स अमली पदार्थांच्या डिलिव्हरीची केंद्र बनलेली आहेत व त्यांना बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबईतून शाळा-महाविद्यालयांच्या जवळ असलेल्या २ हजार २६९ पानटपऱ्या तोडण्यात आल्या व ३८ हजार ८७३ ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
- देशपातळीवर ॲन्टि नार्कोटिक्स टास्क फोर्स
महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या रॅकेटवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशांनंतर देशातील विविध राज्यांत ॲन्टि नार्कोटिक्स टास्क फोर्स गठित झाल्या आहेत. विविध राज्यांकडून गुप्त माहिती एकमेकांना शेअर करण्यात येत आहे व त्यामुळे कारवाया वाढल्या आहेत. महाराष्ट्रात पोलिसांना एखाद्या ‘ड्रग्ज पेडलर’ला पकडल्यानंतर त्याच्या विविध लिंक शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.