शेजारील राज्यांतून येताहेत ४ फुटांपेक्षा माेठ्या मूर्तींच्या ऑर्डर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:37+5:302021-09-27T04:09:37+5:30
आकांक्षा कनोजिया नागपूर : गणेशाेत्सवानंतर आता पुढच्या महिन्यात येणाऱ्या दुर्गा उत्सवाच्या तयारीला वेग आला असून, मूर्तिकार मूर्ती बनविण्याच्या ...
आकांक्षा कनोजिया
नागपूर : गणेशाेत्सवानंतर आता पुढच्या महिन्यात येणाऱ्या दुर्गा उत्सवाच्या तयारीला वेग आला असून, मूर्तिकार मूर्ती बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत. राज्यात ४ फुटांवरील मूर्तीनिर्मितीवर बंदी असली तरी शेजारील राज्यांतून ४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींची मागणी हाेत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
७ ऑक्टाेबरपासून अश्विन नवरात्र उत्सवाला सुरुवात हाेत आहे. शहरातील लहान-माेठ्या पेंडाॅलमध्ये दुर्गा उत्सवाची तयारी केली जात आहे. गेल्या वर्षी काेराेना संक्रमणामुळे धार्मिक व सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली हाेती. मात्र, यावर्षी काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, गणेशाेत्सवाच्या काळात ४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींवर निर्बंध घालण्यात आले हाेते. मात्र, दुर्गा उत्सवापूर्वी अशाप्रकारचे कुठलेही दिशानिर्देश सरकारकडून काढण्यात आले नसल्याने मूर्तिकार आणि मंडळांमध्येही संभ्रमाची स्थिती आहे. मात्र, मूर्तिकार व मंडळे पूर्वीच्या दिशानिर्देशांचे पालन करीत आहेत. दरम्यान, शहरातील मूर्तिकारांकडे शेजारील राज्यांतून माेठ्या मूर्तींच्या ऑर्डर येत असून, त्यांच्यामध्ये उत्साह आहे.
मध्यप्रदेश, विदर्भातूनही ऑर्डर
मूर्तिकारांकडे मध्यप्रदेशच्या बालाघाट, जबलपूर, शिवनी, बैतूल आदी शहरांमधून माेठ्या मू्र्तींसाठी ऑर्डर येत आहेत. साेबतच विदर्भातील भंडारा, गाेंदिया, पुलगाव आणि वर्धा जिल्ह्यातून ४ फूट उंच मूर्तींच्या ऑर्डर येत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. दुर्गा दर्शन सोमवंशी आर्य क्षत्रिय विदर्भ प्रांताचे अध्यक्ष मूर्तिकार मनोज बिंड म्हणाले, मागील वर्षी काेराेना संक्रमणाची परिस्थिती लक्षात घेत धार्मिक कार्यक्रमांवर प्रतिबंध लावण्यात आल्याने मूर्तिकारांना नुकसान सहन करावे लागले. मात्र, यावर्षी ऑर्डर मिळत असून, बाजारात २५ टक्क्यांची वाढ पाहावयास मिळत आहे.
मूर्तींच्या किमतीत वाढ
मूर्ती बनविण्यासाठी ८ ते १० हजार रुपयांत एक ट्रक माती मिळते. कच्चा माल आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमतीत १५ टक्के वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीतही १० टक्के वाढ झाली आहे. मूर्तीसाठी भंडारा, चंद्रपूर, सारगाव, कुही या भागांतून चिकन माती मागविण्यात येते. यावेळी माेठ्या पेंडाॅलमध्ये स्थापित मूर्तींची मागणी कमी झाली आहे. मात्र, घरी स्थापित हाेणाऱ्या मूर्तींची मागणी वाढली आहे.