पोलिसाकडून अवयवदान; शेवटचा श्वासही केला समाजाला अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 05:34 IST2023-08-11T05:33:21+5:302023-08-11T05:34:10+5:30
पत्नीने ठेवला समाजापुढे आदर्श

पोलिसाकडून अवयवदान; शेवटचा श्वासही केला समाजाला अर्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिस आपल्या प्राणांची पर्वा करत नाही. ऋण फेडण्यासाठी शेवटचा श्वासही समाजाला अर्पण करतात. एका पोलिस कुटुंबाने असाच एक आदर्श समाजासमोर ठेवला. आपल्या पोलिस पतीच्या अवयवदानासाठी स्वत: पोलीस असलेल्या पत्नीने दु:ख बाजुला ठेवून अवयवदानासाठी पुढाकार घेतला. कोणत्याही प्रसंगाला सामोरा जाणारा वर्दीवाला तिच्यातही दिसला.
किशोर तिजारे त्या अवयवदात्याचे नाव. तिजारे हे पोलिस हवालदार म्हणून नागपूर शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. ८ ऑगस्ट रोजी त्यांचा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना तपासून ‘ब्रेन डेड’ घोषित केले. पोलिस दलातच कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी सपना तिजारे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या दु:खातही अवयवदान करण्याचा मानवतावादी निर्णय त्यांचा पत्नीने घेतला.
दोन रुग्णांना मिळाले जीवनदान
‘झेडटीसीसी’च्या नियमानुसार एक किडनी न्यू इरा हॉस्पिटलच्या ४७ वर्षीय रुग्णाला, तर दुसरी किडनी केअर हॉस्पिटलच्या ३० वर्षीय रुग्णाला दान करण्यात आली. कॉर्निआ महात्मे आय बँकेला देण्यात आले. वैद्यकीय कारणांमुळे त्यांचे यकृत दान होऊ शकले नाही.